दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षक नियमित येत नसल्याच्या तक्रारींची दखल
प्रतिनिधी /बेळगाव
शहरापासून दूर असलेल्या तालुक्मयातील दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षक नियमित येत नसल्याच्या तक्रारीवरून शिक्षण खात्याने त्यांच्या रोजच्या उपस्थितीचे फोटो व्हॉट्सऍपवर पाठविण्याचा आदेश दिला आहे.
क्लस्टर रिसोर्स पर्सन्स, अधिकारी आणि मुख्याध्यापकांचा एक व्हॉट्सऍप गुप तयार करण्यात येईल. मुख्याध्यापकांनी शाळेच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या प्रार्थनेचे ज्यामध्ये सर्व शिक्षक हजर असतील ते फोटो रोज या ग्रुपवर पाठवायचे आहेत. सर्व शिक्षकांनी आपल्या स्मार्ट फोनद्वारे जीपीएसच्या साहाय्याने आपले लोकेशन पाठविणे गरजेचे आहे.
खानापूर तालुक्मयात 326 सरकारी प्राथमिक आणि 12 माध्यमिक शाळा आहेत. 42 हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी या शाळांवर आहे. जे शिक्षक आपल्या नोकरीच्या ठिकाणी राहत नाहीत, अशा शिक्षकांबद्दल अनेक तक्रारी आहेत. वेळेवर शाळेत हजर न राहणे, जवळच्या शहरात राहून शाळेला रोज हजेरी न लावणे आदी प्रकार सुरू आहेत. तालुका स्तरावरील सभेतही जनप्रतिनिधींनी तक्रार नोंदविली आहे, असे खानापूर ब्लॉक शिक्षण अधिकारी लक्ष्मणराव यक्कुंडी यांनी सांगितले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी काही उपाययोजनांचा विचार करण्यात आला आहे.
या कल्पनेचे खानापूर तालुक्मयातील काही शिक्षकांनी स्वागत केले आहे, तर काहींनी विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. काही शिक्षक अनियमितपणे शाळेला येत असतीलही, पण सर्वांनाच फोटो पाठविण्यास सांगणे चुकीचे आहे, असे मत बेळगाव जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकुमार हेबळ्ळी यांनी व्यक्त करून नियम शिथिल न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सार्वजनिक शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी, या नियमाला विरोध होत आहे. त्यामुळे याचे होणारे फायदे आणि तोटे याबाबत पुनर्विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.









