वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रावर दिल्लीतील रोझ अॅव्हॅन्यू न्यायालय येत्या 7 जुलैला आदेश देणार आहे. त्यांच्या विरोधात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्राची हाताळणी करायची की नाही, या मुद्द्यावर हा आदेश असेल.
काही महिला कुस्तीपटूंनी सिंग यांच्यावर शारिरीक शोषण केल्याचा आरोप केला होता. तशी तक्रारही त्यांच्या विरोधात दिल्लीतील पोलीस स्थानकात सादर करण्यात आली आहे. एका अल्पवयीन कुस्तीपटूनेही अशी तक्रार सादर केली होती. त्यामुळे त्यांना त्वरित पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. तथापि, या अल्पयवीन महिला कुस्तीपटूने नंतर न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत प्रकरण बनत नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या मुद्द्यावरही न्यायालय 7 जुलैला निर्णय देईल अशी शक्यता आहे.
या प्रकरणी 1 जुलैला आदेश दिला जाणार होता. तथापि, अद्यापही काही मुद्द्यांवर तपास सुरु आहे असे दिल्ली पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केल्याने निर्णय 7 जुलैपर्यंत लांबणीवर टाकला गेला आहे. आता 7 जुलैला त्यांच्यावरील आरोपपत्राचे भवितव्य ठरणार असून निर्णयाची साऱ्यांना उत्सुकता आहे.









