प्रतिनिधी /बेंगळूर
अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल कुटुंबांना प्रतिव्यक्ती 10 किलो तांदूळ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जुलै महिन्यापासून ही योजना लागू करण्यात आली असली तरी राज्य सरकारला अतिरिक्त तांदूळसाठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने अतिरिक्त पाच किलो तांदळाऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेतला. आता ही रक्कम बीपेएल रेशनकार्डधारकांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्याचा अधिकृत आदेश जारी केला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या 5 किलो तांदळाशिवाय दरमहा अतिरिक्त 5 किलो तांदूळ असे एकूण 10 किलो तांदूळ वितरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अतिरिक्त तांदूळ खरेदीसाठी राज्य सरकारने टेंडर बोलावले आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन तांदूळ पुरवठा होईपर्यंत लाभार्थींना प्रतिव्यक्ती 5 किलो तांदळाऐवजी प्रतिकिलो 34 रुपयेप्रमाणे पैसे दिले जातील. रेशनकार्डावर असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्यावर डीबीटीमार्फत (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.









