पीडीओंना जि. पं. ची सूचना : काही ग्रा. पं. ना करावी लागणार पदरमोड
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी गॅरंटी योजनेमधील गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ दि. 30 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. म्हैसूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार असून या योजनेच्या जागृतीसाठी ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांनी गावपातळीवर लाभार्थ्यांना बोलावून कार्यक्रमाची माहिती द्यावी, असा आदेश जिल्हा पंचायतीकडून ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
बहुतांश ग्राम पंचायतींमध्ये जागा नसल्याने हा कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी अथवा मंदिरामध्ये भरवून योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, यासाठी आवश्यक असणारी तयारी करण्याची सूचना ग्राम पंचायतींना करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांना योजनेच्या प्रक्षेपणासाठी तयारी करावी लागत आहे.
लाभार्थ्यांना अनुकूल होईल अशा ठिकाणी कार्यक्रम भरवा
हा कार्यक्रम ग्राम पंचायत व्याप्तीतील लाभार्थी नागरिकांना अनुकूल होईल अशा ठिकाणी भरविण्यात यावा, यासाठी टीव्ही अथवा 10×10 च्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करावी, अशी सूचनाही विकास अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. शक्य होईल तितक्या लाभार्थ्यांना एकत्रित करावे. जवळपास 250 नागरिकांना जमविण्याचे आवाहन ग्राम पंचायतींना करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या जागृतीसाठीही प्रयत्न करण्याची सूचना
म्हैसूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या जागृतीसाठीही प्रयत्न करण्याची सूचना करण्यात आली आहे. आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती व फोटो जिल्हा पंचायत कार्यालयाला अपलोड करण्याची सूचनाही केली आहे. आर्थिक संकटात असलेल्या ग्राम पंचायतींना या कार्यक्रमाच्या तयारीसाठी कोणताच निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याने पीडीओंसह ग्राम पंचायत सदस्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने यासाठी विशेष निधी द्यावा, अशी मागणी केली जात आहे. असे असले तरी ग्राम पंचायतींना यासाठी कोणताही निधी देण्यात आलेला नसून ग्राम पंचायतीने स्वखर्चातून कार्यक्रम करावा लागणार असल्याचे विकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.









