महानगरपालिका आयुक्त रुदेश घाळी यांची बैठकीत अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या कामकाजाबाबत तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासक नितेश पाटील यांनी बैठक घेऊन अधिकाऱयांना विविध सूचना केल्या होत्या. त्यापाठोपाठ आता महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी बुधवारी विविध विभागांच्या कारभाराची माहिती घेऊन प्रलंबित कामे निकालात काढण्याचा आदेश दिला.
शहरातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. पथदीप नादुरुस्त झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. शहरवासियांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांकडे असंख्य तक्रारी दाखल झाल्या होत्या. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मनपा कार्यालयाला भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला होता. तसेच काही कामांची विचारणा केली असता व्यवस्थित उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे खंत व्यक्त केली होती. मात्र मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन मनपाच्या अधिकाऱयांना विविध सूचना केल्या होत्या. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बुधवारी दिवसभर विभागस्तरीय बैठका घेऊन कामाचा आढावा घेतला.
नागरिकांच्या कोणताही समस्या प्रलंबित ठेवू नका. इमारत बांधकाम परवानगी असो किंवा अन्य फाईल्स तातडीने निकालात काढा, असा आदेश बजावला. न्यायालयीन वाद सुरू असून त्याकरिता आवश्यक पाठपुरावा आणि कागदपत्रे सादर केली जात नाहीत. त्यामुळे महापालिकेला दंड भरावा लागत आहे. न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेत माहिती पुरवणे आवश्यक होते. पण ती माहिती वेळेत सादर केली नाही. परिणामी न्यायालयाने महापालिकेला दंड भरण्याचा आदेश बजावला आहे. महापालिकेला दहा हजार रुपये दंड भरण्याचा आदेश दिल्याने महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे बुधवारी बैठक घेऊन कागदपत्रांची पूर्तता व प्रलंबित कामे वेळेवर करण्याचा आदेश आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना बजाविला.









