सुरेश वाळवे : पणजीत कादंबरीवर चर्चा
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील खाण व्यवसायामुळे सुबता आली असली तरी मनुष्य जीवनाची अपरिमित हानी झाली. गजानन देसाई यांनी खाण व्याप्त भागातील उध्वस्त जीवन यात मांडले आहे. ही कादंबरी भविष्यातील धोक्याची घंटा सूचवू पाहत असल्याने आत्ताच काळजी घेणे गरजेचे आहे. ‘ओरबिन’ कादंबरीने भविष्याचा वेध घेतल्याने नक्कीच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळेल, असा आशावाद ज्येष्ठ साहित्यिक माजी संपादक सुरेश वाळवे यांनी व्यक्त केला.
इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझातर्फे राष्ट्रीय पुस्तक सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. सोमनाथ कोमरपंत, कला व संस्कृती खात्याचे अशोक परब, लेखक नारायण महाले, लेखक गजानन देसाई, आशा गेहलोत, दशरथ परब, आदी उपस्थित होते.
नारायण महाले यांनी सांगितले की, साहित्यातील नवनिर्मिती म्हणजेच ‘ओरबिन’ कादंबरी होय. या कादंबरीचे अंतरंग म्हणजे अनुभवाची शिदोरी होय. ही कादंबरी आकृतीबंध नसून मुक्त आहे.
सोमनाथ कोमरपंत म्हणाले की , गजानन देसाई यांनी ‘ओरबिन’ या कादंबरीत वर्तमानाचा वेध घेतला असल्याने ही कादंबरी कौतुकास पात्र ठरते. कादंबरीत खाणव्याप्त भागातील लोकांची व्यथा ही अनुभवातून आलेली आहे. ‘ओरबिन’ या कादंबरीने साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवून गोव्याच्या साहित्यात मोलाची भर घालावी.
कादंबरीचे लेखक गजानन देसाई यांनी सांगितले की , कादंबरीचे लिखाण हे सहज निर्माण होत नसते, तर मनात साचलेलं बाहेर येणे म्हणजेच साहित्य निर्मिती होय. खाणीमुळे उध्वस्त झालेल्या लोकांची अवस्था ही या कादंबरीचे प्रतिनिधित्व करते आणि माझ्यादृष्टीने संपूर्ण गोव्यालाच या खाणीमुळे झालेल्या नुकसानीचा विळखा पडेल, असे माझे मत आहे. दशरथ परब यांनी स्वागत केले.