बेळगावचा डीवायईएस संघ तिसऱ्या क्रमांकावर
बेळगाव : मण्णूर येथे धर्मरक्षक ग्रुप आयोजित दसऱ्यानिमित्त निमंत्रितांच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑरेंज आर्मी संघाने शौर्य स्पोर्टस कुमठा संघाचा अतीतटीच्या लढतीत 2-1 अशा गुणफरकाने पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. डीवायईएस बेळगाव संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मण्णूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्यातून जवळपास 16 संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेत पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात शौर्य स्पोर्टस कुमठा व मौर्य स्पोर्टस हुंचेनट्टी संघाचा 2-1 अशा सेटमध्ये पराभव केला. 25-22, 20-25, 15-13, तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात ऑरेंज आर्मी खानापूर संघाने डीवायईएस बेळगाव संघाचा 2-0 असा पराभव केला. 25-20, 25-21 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
तिसऱ्या क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव डीवायईएस संघाने मौर्य स्पोर्टस हुंचेनट्टी संघाचा 25-17, 25-18 अशा सेटमध्ये पराभव करून तिसरे क्रमांक पटकाविले.अंतिम सामन्यात ऑरेंज आर्मी खानापूर संघाने शौर्य स्पोर्टस कुमठा संघाचा 25-17, 20-25, 15-12 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर प्रमुख पाहूणे अशोक चौगुले, अरूण कदम, एच. एस. शिंगाडे, एस. वाय. कोलकार यांच्याहस्ते विजेत्या ऑरेंज आर्मी संघाला 21 हजार रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या शौर्य स्पोर्टस खानापूरला 11 हजार रूपये रोख व चषक तर तिसऱ्या क्रमांक पटकाविलेल्या डीवायईएस संघाला 5 हजार रूपये रोख व चषक देण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून हर्षवर्धन शिंगाडे, शंकर कोलकार, उमेश मजुकर, राजु चौगले, उमेश बेळगुंदकर यांनी काम पाहिले. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धर्मरक्षक ग्रपुच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









