पुणे / प्रतिनिधी :
राज्यात मान्सून सक्रिय झाला असून, पुढील दोन दिवस कोकणातील तुरळक भागात, तर मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला. याशिवाय राज्यभर दमदार पावसाची शक्यता असून, मराठवाडा व विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन ते सध्या ओरिसा व दक्षिण छत्तीसगडच्या भागावर आहे. याबरोबरच पश्चिमी वाऱ्यांनाही बळकटी मिळाली आहे. या दोन्ही दरम्यान कमी दाबाची रेषा कार्यरत आहे. यामुळे राज्यावर मोठय़ा प्रमाणात पावसाचे ढग पसरले आहेत. गुरुवारी अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. घाट क्षेत्रात या पावसाचे प्रमाण अधिक होते. दिवसभर ढगाळ वातावरण, कोंदट हवामान मध्येच पावसाच्या जोरदार सरी असे वातावरण मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात होते. कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होता. मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक जिल्हय़ांना पावसाने झोडपून काढले.
मान्सून सक्रिय
सध्या राज्यात मान्सून सक्रिय आहे. तसेच त्याचा प्रभाव पुढील काही दिवस टिकून राहणार आहे. यात कोकण गोव्यात पुढील सात दिवस पावसाचा प्रभाव राहील. त्यातील पुढील दोन दिवस अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा असून, तुरळक भागात ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. याबरोबरच मध्य महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव पुढील तीन दिवस कायम असेल. मराठवाडा तसेच विदर्भातही पुढील 48 तास पावसाची तीव्रता कायम राहणार आहे.
10 सप्टेंबरनंतर पाऊस कमी
दरम्यान, 10 सप्टेंबरनंतर राज्यातील पाऊस कमी होणार आहे. या पावसामुळे बळीराजासह जनतेला दिलासा मिळाला आहे. शेतीला संजीवनी मिळाली असून, धरणसाठय़ातही वाढ अपेक्षित आहे.








