पुणे / प्रतिनिधी :
नैऋत्य मोसमी पावसाने दिल्ली व्यापत जम्मू काश्मीरपर्यंत धडक मारली असून, पुढच्या दोन दिवसांत मान्सून देश व्यापेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, येत्या 30 जूनपर्यंत कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकरिता ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, काही भागांत अतिवृष्टी वा जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
संथावलेला मान्सून मागच्या दोन दिवसांपासून चांगलाच सक्रिय झाला असून, अर्धा अधिक देश मान्सूनने व्यापला आहे. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र व महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीदरम्यान चक्रीय स्थितीबरोबरच कमी दाबाच्या पट्टयांची निर्मिती झाली आहे. परिणामी मान्सूनच्या पुढील प्रवासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. सोमवारी मान्सून गुजरात, राजस्थानसह जम्मू काश्मीरच्या काही भागातही सक्रिय झाला. येत्या दोन दिवसांत तो संपूर्ण भारत व्यापेल, असे भाकीत हवामान विभागाने वर्तविले आहे.
पुढील पाच दिवस केरळ किनारपट्टीवर अतिवृष्टी होईल. 30 जूनपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अतिजोरदार पाऊस होईल, तर 27 जूनला विदर्भात अतिवृष्टी, तर मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे.