संख :
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने सव्वा लाख बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेतले. सहा महिन्यानंतर त्यांना घरचा रस्ता दाखवला. पण आम्ही राज्यभर आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच महिन्याची मुदतवाढ दिली. शासकीय अध्यादेशही काढला. पण आजही त्यांना रुजू करून घेतले जात नाही. शासन व प्रशासनाची ही दुटप्पी भूमिका शोभणारी नसल्याची टीका करत महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम तुकाराम बाबा महाराज यांनी येत्या पाच जूनपर्यंत या युवा प्रशिक्षणार्थीना नियुक्ती न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
हभप तुकाराम बाबा महाराज यांनी या मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशिक्षणार्थीसह भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. याबाबत बोलताना हभप तुकाराम बाबा महाराज म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ असलेल्या प्रशिक्षणार्थीना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून देखील जिल्हा पातळीवरील कारभाऱ्यांकडून योजनेतल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबरोबर वेतन देखील देण्यात येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
राज्य सरकारने तातडीने याची दखल घेऊन राज्यातल्या सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करून प्रशिक्षणार्थी यांना नियुक्त्या द्याव्यात, ही मागणी आहे. दखल न घेतल्यास येत्या पाच जून रोजी राज्यात आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. शासनाने आमचा अंत पाहू नये, अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला.








