वृत्तसंस्था/ श्रीनगर
डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी अविश्वास प्रस्तावावरील विरोधी पक्षांच्या लोकसभेतील सभात्यागाला चुकीचे ठरविले आहे. मतदानापासून पळ काढायचा होता तर प्रस्ताव आणणे टाळायला हवे होते असे त्यांनी म्हटले आहे. अविश्वास प्रस्तावाकरता विरोधी पक्ष एकत्र आले होते, परंतु मतदानाच्या क्षणी त्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. सभागृहात भाजपला बहुमत आहे हे प्रत्येक जण जाणून आहे. परंतु मतदानात भाग घ्यायचा नव्ह तर अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा अर्थच काय उरतो? विरोधकांनी केलेली ही कृती चुकीची असल्याचे आझाद म्हणाले.
विरोधी पक्षांनी सभात्याग केल्याचे ऐकून मी मोठा निराश झालो. मागील दोन-चार महिन्यांपासून ते एकाच मुद्द्यावर एकत्र आले होते. परंतु अविश्वास प्रस्तावावरील मतदानाची वेळ आल्यावर त्यांनी सभात्याग केला. रालोआलाच नव्हे तर भाजपला स्वबळावर लोकसभेत बहुमत प्राप्त आहे. अशा स्थितीत अविश्वास प्रस्ताव आणला गेल्यावर त्यावर विरोधी पक्षांनी मतदान करणे अपेक्षित होते अशी टिप्पणी आझाद यांनी केली आहे.









