मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरून वाद : 19 जुलैला सर्वपक्षीय बैठक : 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू झालेला हिंसाचार अद्याप न शमल्यामुळे केंद्रीय पातळीवर विविध बैठकांचे सत्र सुरू आहे. गुरुवारी झालेल्या गृह व्यवहारविषयक संसदीय समितीच्या बैठकीत काही मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले. मात्र, चर्चेची मागणी फेटाळल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसदीय समितीच्या बैठकीतून सभात्याग केल्याचे समजते. मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्याची विरोधी पक्षाच्या सदस्यांची मागणी संसदीय समितीच्या प्रमुखांनी फेटाळल्यानंतर गृह व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीच्या विरोधी सदस्यांनी गुऊवारी बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राज्यांमधील तुऊंग सुधारणांवर चर्चा करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी मणिपूरमधील हिंसाचारावर यशस्वी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. संसदेचे अधिवेशन सुरळीत चालावे यासाठी केंद्र सरकारने 19 जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी पॅनेलचे अध्यक्ष ब्रिजलाल यांना पत्र लिहून मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्याची विनंती केली होती. सदर पत्रात मणिपूरच्या स्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे नमूद करण्यात आले होते. मात्र, मणिपूरमधील परिस्थितीवर तातडीने बैठक घेण्यास अध्यक्षांनी असमर्थता व्यक्त केली. जुलैमध्ये तुऊंग सुधारणांबाबत तीन बैठका होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे मणिपूरमधील परिस्थितीवर तातडीने बैठक होऊ शकत नाही. त्याचवेळी, गुऊवारी झालेल्या संसदीय पॅनेलच्या बैठकीत सभापतींसह एकूण सात सदस्य उपस्थित होते. मात्र, या बैठकीत विरोधकांनी मांडलेल्या काही मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांनी सभात्याग केल्याचे समजते. मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारात सुमारे 120 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 3,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच 50 हजारहून अधिक लोकांची छावण्यांमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असताना कारागृहांच्या स्थितीऐवजी मणिपूरमधील हिंसाचारावरच अधिक चर्चा होण्याची अपेक्षा संसदीय समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली होती.









