शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांना निवेदन सादर : सरकारचा निर्णय मान्य नसल्याचे सांगत पालकांकडून निषेध
पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) लागू करण्यावर सरकार ठाम आहे. त्यातच एनईपी कार्यवाहीचे काम अंतिम टप्प्यात म्हणजे जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेले आहे. परंतु हे धोरण लागू करताना खरोखरच विद्यार्थ्यांच्या पालकांचा विचार करण्यात आला आहे का हा प्रश्न आहे. कारण राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार एप्रिलच्या सुरूवातीपासून वर्ग सुरू करण्यास पालकांचा विरोध आहे. हा विरोध उघड उघड नसला तरी अनेक पालकांमध्ये याविषयी खदखद आहे. सरकारकडून एनईपीसाठी अट्टाहास केला जात असल्याच्या प्रतिक्रियाही पालकांतून व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री सावंत यांनी यावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे.
शिक्षण नियम दुऊस्ती मसुद्याला विरोध करीत काही पालकांनी काल सोमवारी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले. संचालक झिंगडे हे अन्य एका कार्यक्रमासाठी बाहेर गेल्याने पालकांसमवेत त्यांची भेट होऊ शकली नाही. सेसील रॉड्रिग्ज, सेबी मास्करान्हेस, टोनी कार्दोज व पालक – शिक्षक संघाच्या सदस्यांनी शिक्षण कार्यालयात निवेदन दिले. एनईपीनुसार आवश्यक ते शिकवणीचे तास पूर्ण होण्यासाठी एप्रिलमध्ये वर्ग घेण्याची आवश्यकता वाटत नाही, असे पालकांनी निवेदन दिल्यानंतर सांगितले. विद्यार्थ्यांचा विचार न करता व पालकांना विश्वासात न घेता एनईपीच्या कार्यवाहीची प्रक्रिया रेटली जात आहे. एप्रिलपासून वर्ग सुरू करण्यासाठी नियम दुरूस्तीच्या मसुद्याचे काम घाईगडबडीत करण्यात आले असल्याने या मसुद्यातही चूक राहिलेली आहे, असा दावाही पालकांनी केला.
2024-25 या शैक्षणिक वर्षात नववीचे वर्ग जूनमध्येच सुरू होऊनही शिक्षणाचे तास पूर्ण झाले. याशिवाय वाढत्या तापमानामुळे दहावी व बारावीची अंतिम परीक्षा शालान्त मंडळाने पुढे ढकलण्याचाही निर्णय घेतला होता. तरीही शिक्षणाचे तास कमी पडण्यावर कोणताच परिणाम झाला नाही, हे शिक्षण मंत्री या नात्याने डॉ. प्रमोद सावंत यांनी समजून घ्यायला हवे. कारण एप्रिलपासून वर्ग सुरू करण्यास शिक्षक तसेच मुख्याध्यापकांचाही विरोध आहे, असे सेबी मास्करान्हस यांनी सांगितले. सूचनांसाठी केवळ पाच दिवसांचा वेळ देण्यात आली. पाच दिवसांपैकी तीन दिवस सुट्टी होती. तरीही मसुद्याला विरोध करताना पालकांतर्फे हरकती सादर करण्यात आल्या आहेत. त्याचा विचार शिक्षण खात्याने करावा. पालकांनी न्यायालयात धाव घेतली असल्याचेही ते म्हणाले.
पालकांकडून निषेध मोर्चा
शिक्षण नियम दुऊस्ती मसुद्याला विरोध करीत एप्रिलपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात पालकांनी जोरदार निदर्शने करीत निषेध नोंदवला. शिक्षण खात्याला निवेदन दिल्यानंतर पालकांनी एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याला जोरदार विरोध करीत सरकारचा आपल्याला हा निर्णय मान्य नसल्याचे सांगितले. सरकारने विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या मागणीचा विचार करायला हवा. त्यांच्यावर नवीन पद्धती लादू नये, असे पालकांनी सोमवारी सांगितले.
असे होतात शिकवणीचे तास पूर्ण, तरीही…!
राष्ट्रीय शिक्षण धोरणाप्रमाणे वर्षाला शिकवणीचे 1 हजार 200 तास पूर्ण होणे गरजेचे आहे. पहिल्याप्रमाणेच जून महिन्यात वर्ग सुरू झाले तरी 220 दिवस शिकवणीसाठी मिळतात. दिवसाला पावणेसहा तास (5 तास, 45 मिनिटे) विद्यालय चालले तरी 1265 तास शिकवणीचे पूर्ण होतात. तरीही सरकारकडून एनईपी धोरणासाठी का अट्टाहास केला जात आहे, अशी विचारणा पालकांनी निवेदनाद्वारे केली आहे.









