विद्यार्थ्यांकडून ‘गो बॅक’च्या घोषणा : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण उपस्थित
वृत्तसंस्था/ लंडन
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या केलॉग कॉलेजमध्ये भाषण करताना विरोधाला सामोरे जावे लागले. काही निदर्शकांनी बंगालमध्ये झालेली हिंसा, आरजी कर महाविद्यालयातील बलात्कार-हत्या प्रकरण आणि संदेशखालीत महिलांवर झालेल्या अत्याचारावरून प्रश्न उपस्थित केले. संबंधित विषय न्यायालयासमोर प्रलंबित आहेत. आरजी कर प्रकरण आता केंद्र सरकारने स्वत:च्या हातात घेतले असल्याचा दावा ममतांनी यावेळी केला. तरीही निदर्शने करणारे विद्यार्थी शांत न झाल्याने ममतांनी येथे राजकारण करू नका, हे राजकारणाचे व्यासपीठ नाही, माझ्या राज्यात या आणि माझ्यासोबत राजकारण करा असे आव्हान दिले.
निदर्शकांच्या घोषणाबाजीमुळे ममता बॅनर्जी यांना स्वत:चे भाषण रोखावे लागले. ही निदर्शने स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय-युके) केली आहेत. आम्ही ममता बॅनर्जींच्या खोट्या दाव्यांना विरोध करत होतो असा दावा विद्यार्थी संघटनेने केला आहे. भाजपने या घटनेला ‘बंगालसाठी लाजिरवाणा’ ठरविले आहे. विदेशात राहणारे बंगाली हिंदू देखील ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवू इच्छितात, कारण त्यांनी बंगालचा वारसा नष्ट केला आहे, अशी टीका भाजपने केली आहे.
ममतांचा दावा
ऑक्सफोर्डमधील कार्यक्रमात सूत्रसंचालकाने ममता बॅनर्जी यांना 2060 पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरणार का असा प्रश्न विचारला होता. यावर ममता बॅनर्जी यांनी असहमती दर्शविली आणि याबद्दल मी वेगळे मत बाळगून असल्याचे म्हटले आहे. याचा व्हिडिओ शेअर करत भाजप नेते अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांना भारत आर्थिक महासत्ता ठरत असल्याने समस्या आहे, विदेशी भूमीवर बसून त्यांना घटनात्मक पदाचा अपमान केल्याचा आरोप केला.









