तेलंगणा सरकारच्या निर्णयावर भडकले केंद्रीय मंत्री
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणात काँग्रेस सरकारकडून करण्यात येणाऱ्या जातनिहाय सर्वेक्षणात मुस्लिमांना मागास वर्गासोबत मागास वर्ग श्रेणीत सामील करण्यावर केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी आक्षेप घेतला आहे. या पावलामुळे मागास वर्गासोबत अन्याय होईल. असा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. भूतकाळात वायएस राजशेखर रेड्डी यांच्या काँग्रेस सरकारने एकसंध आंध्रप्रदेशात मागास मुस्लिमांना मागास वर्ग श्रेणीच्या अंतर्गत 4 टक्के आरक्षण दिले होते याची आठवण केंद्रीय मंत्र्यांनी करीमगनर येथे रोड शोमध्ये भाग घेत करून दिली आहे.
मागास वर्गाच्या अनेक जातींच्या प्रतिनिधींनी देखील तेलंगणा सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. यापूर्वी तेलंगणात बीआरएस सरकार असताना मागास वर्गाची एकूण लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 51 टक्के होती. तर वर्तमान सरकारच्या सर्वेक्षणात राज्यात मागास वर्गाची लोकसंख्या केवळ 46 टक्के असल्याचा दावा करण्यात आला आहे असा दावा भाजप नेत्याने केला आहे. तर तेलंगणाचे मागास वर्ग कल्याण मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी जातनिहाय सर्वेक्षणाच्या अहवालासंबंधी मागास वर्गाच्या जातींच्या संघटनांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
तेलंगणा भाजप अध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी देखील मागास वर्गात मुस्लिमांना सामील करण्यास आक्षेप दर्शविला होता तसेच यामुळे राज्याच्या मागास वर्गाचे हित प्रभावित होतील असा दावा केला होता.
काँग्रेसकडून आश्वासन
तेलंगणात करण्यात आलेल्या जातनिहाय सर्वेक्षणात राज्याच्या एकूण 3.70 कोटी लोकसंख्येत मागास जातींचे प्रमाण 42.25 टक्के असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. याचबरोबर अनूसचित जातींचे प्रमाण 17.43 टक्के, अनुसूचित जमातींचे प्रमाण 10.45 टक्के, मुस्लीम 10.08 टक्के आणि इतर जातींचे प्रमाण 13.31 टक्के असल्याचे म्हटले गेले आहे. तेलंगणात काँग्रेसने जातनिहाय सर्वेक्षण करविण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाच्या अंतर्गत हे जातनिहाय सर्वेक्षण करविण्यात आले आहे.









