पर्यावरणप्रेमींचे जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाद्वारे निवेदन : पश्चिम घाटातील जैवविविधता-नैसर्गिक वनसंपत्तीचा नाश थांबविण्याची मागणी
बेळगाव : खानापूर व बेळगावसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या म्हादई नदीचे पाणी वळविल्यास पश्चिम घाटातील जैवविविधता व नैसर्गिक वनसंपत्तीचा नाश होणार आहे. आणि उत्तर कर्नाटकाचे रुपांतर वाळवंटात होण्याची शक्यता आहे. यामुळे म्हादई आणि कळसा भांडुरा प्रकल्प रद्द करावा, यासाठी पर्यावरणप्रेमी व प्रकल्पविरोधकांनी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तत्पूर्वी सरदार्स मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. रॅली फॉर बेळगावतर्फे ‘म्हादई बचाव, आमचे भविष्य वाचवा’ या घोषवाक्याखाली ही रॅली निघाली.
कर्नाटक सरकार म्हादई नदीचे पाणी हुबळी-धारवाड प्रदेशातील पिण्याच्या पाण्याच्या गरजांसाठी असल्याचा दावा करत आहे. पण प्रत्यक्षात हे पाणी उद्योगासाठी वापरण्यात येणार आहे. पश्चिम घाट हा भौगोलिकदृष्ट्या विशेष असून तो आपल्या भूमीचा आत्मा आहे. यामुळे आपल्या नद्या, पिके, संस्कृती व हवामानाचे पोषण होते. कळसा-भांडुरा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांसह या भागातील सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार आहे. यामुळे याचा गांभीर्याने विचार करून कळसा-भांडुरा प्रकल्प बंद करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पर्यावरण संरक्षण कायदा 1986 व वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत मंजुरी न घेता हा प्रकल्प राबविला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार हवामान मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार अभयारण्याच्या 15 कि. मी. पर्यंत प्रकल्प राबविणे आवश्यक असताना हा प्रकल्प भीमगड अभयारण्य सीमेपासून काही अंतरावर राबविण्याचा घाट कर्नाटक सरकारने चालविला आहे, याचा आम्ही निषेध करतो, असे रॅलीत सहभागी नागरिकांनी व पर्यावरणप्रेमींनी स्पष्ट केले. भीमगड अभयारण्य हे एक जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त पर्यावरणीय स्थळ आहे. हे अभयारण्य कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्प, गोव्यातील म्हादई व भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य वन्यजीवांसाठी कॉरिडोर म्हणून ओळखले जाते. प्रकल्प झाल्यास नागरिक व वन्यजीवांचा संघर्ष वाढणार असून पावसाळी नद्यांना आधार देणाऱ्या नाजूक पर्वतीय प्रवाह व जलसाठ्यांचा ऱ्हास होऊन याचा थेट परिणाम म्हादई, भीमगड व बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकावर होणार आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हुबळी-धारवाड प्रदेशातील पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागविण्यासाठी अनेक पर्यायी उपाययोजना उपलब्ध आहेत. यामध्ये स्थानिक तलावांचे पुनऊज्जीवन, जलशुद्धीकरण, जलाशयांमधील गाळ काढणे, विकेंद्रित जलसंचय करणे गरजेचे असताना कोणतीही शाश्वत उपाययोजना न करता कळसा-भांडुरा प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. याचा आम्ही तीव्र निषेध करत असून कर्नाटक सरकारने हा प्रकल्प बंद करून प्रदेशातील वन्यजीव, शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा. या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरूच ठेवल्यास यापुढेही आमचा विरोध कायम राहण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या रॅलीचे नेतृत्व सुजित मुळगुंद, दिलीप कामत, कॅप्टन नितीन धोंड, शिवाजी कागणीकर, अमृत चरंतीमठ, लिंगराज जगजंपी, नायला कोयलो, रविंद्र सैनी, नीता पोतदार, शारदा गोपाल यांनी केले. याशिवाय या रॅलीला पाठिंबा व प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उत्तराखंड येथून आलेली 17 वर्षीय सिद्धीमा पांडे सुद्धा रॅलीत सहभागी झाली होती. या रॅलीत सुरेश हेबाळीकर, नागेंद्र प्रभू, अॅड. नितीन बोलबंडी, रविंद्र बेल्लद, प्रेम चौगुला, राजीव टोपण्णावर, आनंद देसाई, बाबा भायकरनाथ, गीता साहू, डॉ. संजीव कुलकर्णी, डॉ. सागर धर, आयुब जकाती, अॅड. सुनीता पाटील, लतीफखान पठाण, प्रशांत कामत, शाहरुख जकाती, शैलेंद्र शिरोडकर यांच्यासह बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.









