वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशात जातीनिहाय जनगणना केली जावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. तथापि, या मागणीला आता त्याच पक्षातून विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना एक पत्र पाठविले असून जातीनिहाय जनगणनेला विरोध केला आहे. जातिनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेसच्या पूर्वापारपासून चालत आलेल्या धोरणांच्या विरोधात आहे. अशा जनगणनेचा आग्रह धरल्यास त्याचा अर्थ काँग्रेस इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या परंपरेचा अवमान करत आहे, असा घेतला जाईल. यामुळे काँग्रेसची हानी होईल. काँग्रेसने ही मागणी सोडून द्यावी. या मागणीचा राजकीय लाभ होणार नाही, असे प्रतिपादन शर्मा यांनी केले आहे.
जात ही वस्तुस्थिती, पण…
भारतात जात ही वस्तुस्थिती आहे. मात्र, काँग्रेसने कधीही जातीच्या आधारावर राजकारण केलेले नाही. तसेच जात्याधारित अस्मितेच्या राजकारणाला प्रोत्साहन दिलेले नाही. जातीय भावनांच्या आधारावरील राजकारण लोकशाहीला घातक आहे. काँग्रेसने कधीही असे राजकारण केलेले नाही किंवा अशा राजकारणाला मान्यता दिलेली नाही. भारतीय समाज विविध जाती, जमाती, धर्म, पंथ आणि विचार यांचा संगम आहे. ही बहुविधता पक्षाने नेहमीच जपली आहे. जातींच्या आधारावरील जनगणना या बहुविधतेत असमतोल निर्माण करणारी आहे. काँग्रेसने अशा प्रकारचे राजकारण टाळावे, अशी मागणीही आनंद शर्मा यांनी आपल्या पत्रात केली आहे.
काँग्रेसचे धोरण सर्वसमावेशक
काँग्रेसने नेहमीच समावेशक धोरणाचा स्वीकार केला आहे. काँग्रेसचे सामाजिक न्यायाचे धोरण नेहमीच अभ्यासपूर्ण माहिती आणि भारतीय समाज भावनेचे समंजस विश्लेषण यांच्यावर आधारित आहे. 1980 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने विजय मिळविला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसची घोषणा ‘ना जात पर, ना पात पर, मोहर लगेगी हाथ पर’ अशी होती. ही बाब आनंद शर्मा यांनी त्यांच्या पत्रात स्पष्टपणे अधोरेखित केली आहे.
राजीव गांधींचेही उदाहरण
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1990 मध्ये लोकसभेत केलेल्या भाषणाचा उल्लेख शर्मा यांनी पत्रात केला आहे. देशात जातीयवाद पसरेल, अशा प्रकारे जातीची व्याख्या करण्यास काँग्रेसचा विरोध आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये जात हा एक घटक बनविल्यास तशा धोरणालाही काँग्रेसचा विरोध आहे. जातीच्या आधारावर देशाची विभागणी करण्याचा प्रयत्न झाल्यास काँग्रेस तो स्वस्थपणे बघणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन गांधी यांनी त्या भाषणात केले होते.
बेरोजगारीवर हा तोडगा नाही
जातीच्या आधारावरील जनगणना हा बेरोजगारीची समस्या किंवा सामाजिक असमानतेची समस्या यांच्यावरील तोडगा नाही. त्यामुळे यावर भर देण्यात अर्थ नाही. जातीसारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर विचारपूर्वक धोरण आखण्यात आले नाही, तर भविष्यकाळात त्याचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात, असा इशाराही आनंद शर्मा यांनी खर्गे यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.









