इराण्णा कडाडी यांच्याकडे म्हैसूरपर्यंत थेट रेल्वेची मागणी
बेळगाव : बेळगाव-धारवाड-म्हैसूर एक्स्प्रेस नैर्त्रुत्य रेल्वेने प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी शनिवार दि. 15 जुलैपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नैर्त्रुत्य रेल्वेच्या या निर्णयाने बेळगावमधील प्रवासी संतापले आहेत. काही प्रवाशांनी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांची भेट घेऊन रेल्वेच्या चुकीच्या वेळापत्रकामुळे रेल्वेला प्रतिसाद कमी मिळाला. परंतु ही रेल्वे बेळगावसाठी महत्त्वाची असल्याने रद्द होणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. म्हैसूर-धारवाड एक्स्प्रेस बेळगावपर्यंत सुरू करण्यात आली. म्हैसूर-धारवाड सुपरफास्ट असणारी एक्स्प्रेस धारवाड ते बेळगावदरम्यान अनारक्षित एक्स्प्रेस म्हणून सुरू करण्यात आली. सायंकाळी 7.30 वा. बेळगावहून निघालेली एक्स्प्रेस रात्री 9.55 वा. धारवाडला पोहोचते. तर सकाळी 8.15 वा. धारवाडमधून निघालेली एक्स्प्रेस 11.00 वा. बेळगावला येते.
याचदरम्यान, चन्नम्मा एक्स्प्रेस धावत असल्यामुळे बेळगाव ते धारवाड दरम्यान, प्रवाशांचा प्रतिसाद कमी प्रमाणात मिळाला. परंतु नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाव ते म्हैसूर अशी थेट रेल्वे सुरू केली असती तर प्रतिसाद वाढला असता. कारण बेळगावमधील प्रवाशांना धारवाडपर्यंत अनारक्षित एक्स्प्रेसचे तिकीट काढून धारवाड रेल्वेस्थानकावर उतरून येथून पुढे म्हैसूरपर्यंत तिकीट काढावे लागत होते. बेळगावमधून म्हैसूरला जाण्यासाठी रात्रीची सेवा उपलब्ध असल्याने ही रेल्वे महत्त्वाची होणार होती. परंतु नैर्त्रुत्य रेल्वेच्या कारभारामुळे या रेल्वेला प्रतिसाद मिळू शकला नाही. नैर्त्रुत्य रेल्वेने एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याला प्रवाशांचा विरोध होत आहे. बेळगाव-म्हैसूर या मार्गावर थेट रेल्वेसेवा सुरू केल्यास प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ही एक्स्प्रेस रद्द करू नये, अशी मागणी प्रवाशांनी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्याकडे केली. कडाडी यांनी प्रवाशांचे म्हणणे ऐकून घेऊन आपण यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे.









