संसदीय प्रक्रियेच्या अवहेलनेबद्दल चिंता व्यक्त
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेससह विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. लोकसभाध्यक्ष बिर्ला यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विरोधी नेत्यांच्या शिष्टमंडळाने राहुल गांधी यांना सभागृहात बोलण्याची संधी न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच यासंदर्भात एक पत्रही सादर केले. या पत्रात विरोधी पक्षांनी आठ मुद्दे उपस्थित केले आहेत. या पत्रात विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी न देणे, आतापर्यंत लोकसभा उपसभापतींची निवड न करणे, विरोधी खासदारांचे माईक बंद करणे अशा मुद्यांचा समावेश आहे.
विरोधकांनी सभापतींना सादर केलेल्या पत्रात, कामकाज सल्लागार समितीच्या निर्णयांकडे दुर्लक्ष करणे, स्थगन प्रस्तावाची सूचना पूर्णपणे निक्रिय करणे, सदस्यांच्या खासगी विधेयके आणि प्रस्तावांकडे दुर्लक्ष करणे, अर्थसंकल्प आणि अनुदान मागण्यांवरील चर्चेत महत्त्वाच्या मंत्रालयांचा समावेश न करणे, नियम 193 अंतर्गत खूप कमी चर्चा करणे आणि सभागृहात मुद्दे उपस्थित करताना विरोधी सदस्यांचे माइक बंद करणे असे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. विरोधी पक्षाचे खासदार कोणताही मुद्दा उपस्थित करतात तेव्हा त्यांचे मायक्रोफोन बंद केले जातात आणि उलटपक्षी, जेव्हा सत्ताधारी पक्षाचे मंत्री किंवा खासदार बोलू इच्छितात तेव्हा त्यांना लगेच बोलण्याची परवानगी दिली जाते, असा दावा विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने केला आहे.









