संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील आठवड्यात 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बिहारमधील मतदार यादीच्या फेरसर्वेक्षणावरून (एसआयआर) मोठ्या राजकीय लढाईची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीतील पक्ष या मुद्यावर एकत्र आले असून सरकारला घेरण्याची रणनीती आखत आहेत. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि तृणमूल काँग्रेस या मुद्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात स्थगन प्रस्ताव आणण्याची तयारी करत आहेत.
संसदेत सर्व मुद्यांवर चर्चेसाठी एकमत निर्माण करण्याचे सरकारचे प्रयत्न असूनही बिहारमधील निवडणूक राजकारण एक मोठा अडथळा बनू शकते. सरकारसाठी दिलासा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ‘एसआयआर’ला स्थगिती दिलेली नाही. पुढील सुनावणी 28 जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे सरकार न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा दाखल देत विरोधकांना आवर घालू शकते.









