अखिलेश यादव, केजरीवालसह अनेक नेते उपस्थित, भाजपला केले लक्ष्य
खम्माम / वृत्तसंस्था
तेलंगणातील सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समितीने (पूर्वीची तेलंगणा राष्ट्र समिती) आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षांनी शक्तीप्रदर्शन केले आहे. हा कार्यक्रमा खम्माम येथे आयोजित करण्यात आला होता. उपस्थित विरोधी पक्ष नेत्यांनी जाहीर सभेत भाषणे केली. भाजपला लक्ष्य करणे हेच विरोधी पक्षाचे लक्ष्य असल्याचेही स्पष्टपणे दिसून आले. या कार्यक्रमाला सप नेते अखिलेश यादव, दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी नेते उपस्थित होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि या सभेचे आयोजक के. सी. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या भाषणात भाजपला पर्याय म्हणून विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत असे प्रतिपादन केले. तेलंगणातील रयथू योजना ही अतिशय यशस्वी ठरली असून ती सर्व देशामध्ये लागू केली पाहिजे, अशी मागणी केली.
यादव यांची टीका
भाजप सरकारचे आता 400 दिवस उरले आहेत. भाजपनेच असे म्हटले आहे की या सरकारचे आता 400 दिवस उरले आहेत. याचाच अर्थ असा की पुढील लोकसभा निवडणुकीत आपल्याला विजय मिळणार नाही, हे भाजपनेच मान्य येले आहे. जनता आता भाजपला कंटाळली असून ती पर्यायाच्या शोधात आहे. विरोधी पक्षानी ऐक्य करुन निवडणूक लढविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
विजयन यांचे शरसंधान
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही भाजपवर तोंडसुख घेतले. सध्याचे केंद्रातील सरकार लोकशाही विरोधी आहे. ते लोकशाहीला नेस्तनाबूत करु पहात आहे. आज आम्ही या सरकारला विरोध करण्यासाठी एक मंच स्थापन करीत आहोत. केंद्रातील सरकार धनदांडग्या लोकांचे असून सर्वसामान्य जनतेशी या सरकारला काहीही देणेघेणे नाही. विरोधी पक्ष एकत्र आल्यास या सरकारचे पतन निश्चित आहे, असे प्रतिपादन विजयन यांनी भाषणात केले.
केंद्राची सूडबुद्धी
केंद्र सरकार सरकारी प्राधिकरणांचा उपयोग विरोधी पक्षांना दाबून टाकण्यासाठी करीत आहे. दिल्ली, पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आदी विरोधी पक्षांची सत्ता आलेल्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. राज्यपालांचा उपयोग करुन या सरकारांना त्रास देण्याचे केंद्राचे धोरण आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या भाषणात केला.
मंदिराला भेट
सर्व विरोधी पक्षनेत्यांसमवेत चंद्रशेखर राव यांनी खम्माम येथील यद्राद्री मंदिराला भेट दिली. तेथे त्यांनी पूजाआर्चाही केली. राव सरकारने या मंदिराचा मोठय़ा प्रमाणात जीर्णोद्धार केला आहे. आपण हिंदू विरोधी नाही हे दर्शविण्याचा हा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे, असे मत काही विचारवंतांनी व्यक्त केले आहे.









