पणजी ; म्हादई प्रश्नाबाबत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून सरकारने म्हादई कर्नाटकाला मुद्दामहून दिली असल्याचा आरोप करुन येत्या विधानसभा अधिवेशनात म्हादई आणि राज्यात घडणाऱ्या आगीच्या घटनांवरुन सरकारला धारेवर धरणार असे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले. काल सोमवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत युरी आलेमाव बोलत होते. त्यांच्या सोबत गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आपचे आमदार एल्टन डिकॉस्टा, काँग्रेसचे हळदोणे मतदारसंघाचे आमदार कार्लुस पेरेरा होते. प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारने महागाई, बेकारी, शिक्षण धोरण असे अनेक प्रश्न जनतेसमोर उभे केले आहेत. त्याचा जाब सरकारला द्यावाच लागेल, असेही आलेमाव म्हणाले. विधानसभा अधिवेशनात विरोधी आमदारांना जास्तीत जास्त वेळ द्यावी, प्रश्नांची संख्या वाढवावी, लक्षवेधी सूचना, शून्यप्रहाराची वेळ वाढवावी, सभागृहाचे कामकाज नियमानुसार चलवावे, अशा विविध मागण्या करणारे लेखी निवेदन सभापतींना सादर केल्याची माहिती आलेमाव यांनी दिली.
सरकार 17 टक्के आमदारांना घाबरते
सरकारने विधानसभा अधिवेशनाच्या कार्यकाळाचे दिवस कमी करून 83 टक्के आमदारांचे सरकार 17 टक्के विरोधकांना घाबरत असल्याचे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री कर्नाटकाला म्हादई बहाल करून कन्नड भाषेचून तेथील भाजपसाठी मते मागत आहेत. गोवाच्या भाजप आमदारांनी गोलमाल करून म्हादई कर्नाटकाला बहाल केली आहे, अशी टीका विजय सरदेसाई यांनी केली आहे.









