राज्य सरकारचा निर्णय : पत्राद्वारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती
बेंगळूर : मतदारसंघांच्या विकासासाठी निधी दिला जात नसल्याने सत्ताधारी काँग्रेस आमदारांनीच राज्य सरकारवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी काँग्रेस आमदारांना त्यांच्या मतदारसंघांसाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये निधी दिला होता. आता विरोधी पक्षातील आमदारांना प्रत्येकी 25 कोटी रु. निधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. केवळ काँग्रेस पक्षाच्या आमदारांना सरकारकडून मतदारसंघ विकास निधी दिला जात असल्याचा आरोप भाजप आणि निजद आमदारांनी केला होता. विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आम्हालाही निधी द्यावा, अशी मागणी केली होती.
आता या मागणीची दखल घेण्यात आली असून भाजप व निजदच्या आमदारांना प्रत्येकी 25 कोटीचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुदान वाटपाबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधी आमदारांना उद्देशून पत्र लिहिले आहे. राज्य अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे पायाभूत सुविधा विकास योजनेंतर्गत मतदारसंघांतील विकासकामांसाठी विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास-पंचायतराज खात्यांतर्गत रस्ते आणि पुलांच्या कामासाठी तसेच शहर विकास खात्यांतर्गत कामांसाठी 18.75 कोटी रु. अनुदान देण्यात येईल. तसेच इतर खात्यांच्या कामांसाठी 6.25 कोटी रु. देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणकोणत्या कामांसाठी हा निधी वापरावा, याचे अधिकार आमदारांना असतील.









