मणिपुरातील हिंसाचारप्रकरणी सभापतींनी चर्चेचे आश्वासन देऊनही विरोधकांकडून असभ्य वर्तन
पणजी : मणिपूर हिंसाचारप्रकरणी काल सोमवारी चर्चा करण्यास नकार देऊन ही चर्चा शुक्रवारी करुया, असे सभापतींनी सांगितल्याने विरोधी पक्षीय आमदारांनी विधानसभेत धिंगाणा घालून राडा केला. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तसेच मंत्री, सत्ताधारी आमदारांनी विरोधकांच्या कृत्त्याचा जोरदार निषेध केला. सभागृहाचा हा मोठा अपमान असल्याचे सांगून याची गंभीर दाखल घेण्यात यावी, अशी मागणी सभापतींकडे केली. सभापती रमेश तवडकर यांनी सर्व सातही विरोधी आमदारांची नावे पुकारून त्यांना दुपारच्या भोजनानंतरपासून मंगळवारपर्यंत, अशा दोन दिवसांसाठी निलंबित केले. काळा पोषाख केलेल्या त्या सर्व विरोधी आमदारांनी प्रथम शून्य तासाला हातात फलक घेऊन सभापतींसमोर घोषणाबाजी केली. नंतर त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर जाऊन फलक दाखवले, पुढे त्यांनी आपला मोर्चा आमदार जीत आरोलकर यांच्याकडे वळवला आणि त्यांना घेराव घातला. एवढेच नव्हे, तर त्यांचा माईक हिसकावला तसेच त्यांची कागदपत्रे फेकून दिली. यावेळी विरोधकांना रोखण्यासाठी आलेल्या मार्शलची टोपी काढून ती आरोलकर यांच्या डोक्यावर घालण्यात आली. शेवटी मार्शलकरवी विरोधी आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. तसेच सभापतींकडून त्यांना दोन दिवसांसाठी निलंबित घोषित करण्यात आले.
विरोधकांनी फेटाळली सभापतींची सूचना
काँग्रेस, आप, आरजी व गोवा फॉरवर्ड या चार विरोधी पक्षांचे आमदार काळा पोषाख करून आले होते. तेव्हाच ते काहीतरी करणार याची कुणकुण लागली होती. प्रश्नोत्तर तास संपल्यावर शून्य तासाला त्या विरोधी आमदारांनी मणिपूरचा विषय उपस्थित केला आणि त्यावर चर्चेची मागणी केली. ती मागणी सभापतींनी फेटाळली आणि त्या विषयी शुक्रवारी चर्चा होऊ शकते, असे सांगून त्या दिवशी चर्चा करूया, असे सूचवले. विरोधकांनी त्यांची सूचना फेटाळली आणि ते सर्वजण हातात फलक घेऊन सभापतींसमोर आले.
मुख्यमंत्र्यांच्यासमोर आले विरोधक
सत्ताधारी आमदारांनी विरोधकांच्या या कृत्त्यास आक्षेप घेतला. सभापतींनी देखील विरोधकांना जागेवर बसण्याची विनंती केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ होऊन गदारोळ माजला. याच गोंधळात सभापतींनी शून्य तासाचे कामकाज पुढे चालू ठेवले. आमदार संकल्प आमोणकर यांनी त्याच गदारोळात आपला विषय मांडला. नंतर विरोधक मुख्यमंत्र्यांच्यासमोर आले आणि फलक घेऊन चर्चेची मागणी करू लागले. वनमंत्री विश्वजित राणे यांनी त्याच गोंधळात आपले निवेदन केले.
जीत आरोलकरांसमोर आणले अडथळे
आमदार जीत आरोलकर आपला विषय मांडण्यासाठी उभे राहिले असता सर्व विरोधी आमदार त्यांच्याकडे गेले. त्यांनी आरोलकरांना गराडा घातला आणि मणिपूर विषयासाठी साथ देण्याची मागणी केली. आरोलकरांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. ते आपला विषय मांडत असताना विरोधी आमदारांनी त्यांना अडथळे आणले. आमदार सरदेसाई यांनी त्यांच्या माईकमधून ‘मणिपूर-मणिपूर’ अशी घोषणाबाजी केली आणि त्यांना त्यांचा विषय मांडण्यास दिला नाही.
मार्शलनी विरोधकांना काढले सभागृहाबाहेर
विरोधकांच्या या कृत्त्यास सत्ताधारी आमदारांनी जोरदार हरकत घेतली आणि त्या सर्व विरोधी आमदारांना बाहेर काढण्याची मागणी केली. त्यामुळे गोंधळ, गदारोळ वाढतच गेला. शेवटी सभापतींनी विरोधकांना सभागृहाबाहेर काढण्याची सूचना मार्शलना केली, तेव्हा मार्शलनी त्यांना बाहेर नेले. त्यानंतर सभागृहातील गोंधळ संपुष्टात आला.
आरोलकरांनी कथन केला सारा प्रकार
या प्रकारामुळे सत्ताधारी मंत्री, आमदार संतापले. विरोधी आमदारांनी नेमके काय केले ते आरोलकरांनी सांगावे, अशी विनवणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली. त्यानुसार आरोलकरांनी घडलेला संपूर्ण प्रकार पुन्हा सभागृहासमोर कथन केला आणि हा आपला अपमान असल्याचे सांगितले.
विरोधकांवर कारवाईची मुख्यमंत्र्यांची मागणी
हा सत्ताधारी आमदार, सभागृहाचा अपमान असल्याचे नमूद करून सभापतीनी विरोधी आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी तसेच मंत्री, व सत्ताधारी आमदारांनी लावून धरली. आमदारांची अडवणूक करणे चुकीचे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. नंतर आपण कारवाई करतो, असे प्रथम सभापतींनी नमूद पेले आणि कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी मंत्री, आमदारांनी त्यांना रोखले. आताच आम्हाला न्याय द्या, हा अन्याय सहन करणार नाही असे डॉ. सावंत व इतरांनी बजावले.
सातही विरोधक सभापतींकडून निलंबित
विधानसभेच्या नियम 289 नुसार युरी आलेमांव, वीरेश बोरकर, व्हेन्झी व्हिएगश, विजय सरदेसाई, व्रुझ सिल्वा, कार्लूस फरेरा, एल्टॉन डिकॉस्ता यांची नावे घेऊन सभापती तवडकर यांनी त्या सर्वांना दोन दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याचे सांगितले.
दोन दिवसांचे निलंबन आले 24 तासांवर
मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या विनंतीनुसार निलंबन केले शिथिल : सभापती
विरोधकांनी केलेल्या गैर कृत्त्याबद्दल सभापती रमेश तवडकर यांनी विरोधी सातही आमदारांना दोन दिवसांसाठी निलंबित केले होते. परंतु संध्याकाळी कामकाज संपल्यानंतर हे दोन दिवसांचे निलंबन पाठीमागे घेऊन केवळ 24 तासांसाठी विरोधी आमदारांना निलंबित करीत आहे. मंगळवार 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजल्यानंतर निलंबित झालेले आमदार सभागृहात येऊन कामकाजात सहभागी होऊ शकतात, असे सभापतींनी स्पष्ट सांगितले.
सभापती तवडकर म्हणाले, निवडून आलेल्या आमदारांनी सभागृहाची मानमर्यादा राखणे गरजेचे असते. जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, सभागृहाचे महत्त्व व मानमर्यादा यांना ठेच पोहचू नये, यासाठी यापुढे निवडून आलेल्या सर्व आमदारांनी याचे भान ठेवून सभागृहात आपल्या मागण्या मांडव्यात, मते व्यक्त करावीत. काल सोमवारी झालेला गदारोळ आणि एका आमदाराला आमदारांनी सभागृहात घातलेला घेराव हा आक्षेपार्ह होता. त्यामुळे अशाप्रकारचे वर्तन यापुढे होऊ न देण्याची विनंतीही सभापती तवडकर यांनी केली.
विरोधकांवर दोन दिवसांसाठी लागू केलेले निलंबन शिथिल करण्यासंबंधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व सरकारातील वरिष्ठ मंत्र्यांनी विनंती केली होती. तसेच विरोधी आमदारांतीलही काहीजणांनी निलंबन रद्द करण्याविषयी विनंती होती, असेही सभापती तवडकर यांनी सांगितले.









