वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 12 जूनला पाटणा येथे आयोजित केलेली विरोधी पक्षांची बैठक लांबणीवर टाकण्यात आली आहे. अनेक विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपलब्ध नसल्याने ही बैठक पुढे ढकलावी लागल्याचे नितीशकुमार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
विरोधी पक्षांनी 2024 ची लोकसभा निवडणूक एकत्रितरित्या लढविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. या प्रयत्नांना योग्य दिशा देण्यासाठी कुमार यांनी ही बैठक आयोजित केली होती. संजदचे अनेक नेते इतर विरोधी पक्षांच्या प्रमुखांना भेटले होते. तथापि, राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर असल्याने आणि इतर पक्षांचे नेतेही त्यांच्या कामात व्यग्र असल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या पहिल्याच बैठकीत जर अनेक नेते अनुपस्थित राहिले असते तर लोकांमध्ये चुकीचा संदेश गेला असता. त्यामुळे बैठकच पुढे ढकलणे योग्य मानण्यात आले. आता ही बैठक 23 जूनला होण्याची शक्यता आहे. पण या बैठकीसंबंधात इतरही अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचे बोलले जाते.
नितीशकुमारांच्या नेतृत्वाला आक्षेप?
विरोधी पक्षांचे ऐक्य घडवून आणण्यात नितीशकुमार यांनी पुढाकार घ्यावा, हे अनेक विरोधी पक्षनेत्यांना रुचलेले नाही, अशी चर्चा आहे. ही बैठक त्यांच्या पुढाकाराने पाटणा येथे झाल्यास नितीशकुमार हेच विरोधी पक्षांचा चेहरा आहेत, ही बाब लोकांच्या मनावर ठसण्याची शक्यता असून अनेक नेत्यांना ते पसंत नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नितीशकुमार यांना अशी बैठक बोलाविण्याची सूचना केली होती. पण त्यामुळे अनेक पक्षांचे नेते नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी या बैठकीला येण्यास टाळाटाळ चालविली आहे, अशीही चर्चा आहे.
एकास एक उमेदवार देणार
भाजपच्या एका उमेदवाराला विरोधी पक्षांचा एकच उमेदवार असावा, असा मतप्रवाह असून त्यानुसार रणनीती आखण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अशाप्रकारे योजना करण्यात अनेक अडचणी आहेत. विशेषत: काँग्रेसला यासाठी बऱ्याच जागांवर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची ही संभाव्य युती राष्ट्रीय पातळीवर होणार की, राज्य पातळीवर, हे अद्याप स्पष्ट नाही. युतीसंबंधी स्पष्टता येण्यास काही काळ जावा लागणार आहे असे बोलले जाते.