केंद्र आणि राज्य सरकारवर दुर्लक्ष केल्याची टीका
► वृत्तसंस्था / इंफाळ
केंद्र आणि राज्य सरकारने मणिपूरच्या परिस्थितीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्थिती चिघळली असून आता कठोर पावले उचलणे आवशयक बनले आहे, अशीं टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. आयएनडीआयए (उच्चारी इंडिया) या नावाखाली स्थापन करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या युतीच्या काही खासदारांनी शनिवारी माणिपूरला भेट दिली. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले.
मणिपूर राज्याच्या चुरचंदनपूर येथे या खासदारांनी कुकी नेत्यांची आणि अन्य काही समाजिक संघटनांच्या नेत्यांची भेट घेतली. या राज्यात गेले तीन महिने कुकी आणि मैतेयी समाजांमध्ये मोठा संघर्ष होत असून अनेकदा रक्तरंजित हिंसाचार झाला आहे. काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी पत्रकारांशी चर्चा करताना केंद्रावर टीका केली. या राज्यात महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता केंद्र सरकार या तीन महिन्यांपूर्वी झालेल्या प्रकाराची सीबीआय चौकशी करणार आहे. पण आतापर्यंत सरकार झोपले होते काय, असा प्रश्न चौधरी यांनी विचारला.
मैतेयी समाजाशीही बोलणार
विरोधी पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ रविवारी मैतेयी समाजाच्या नेत्यांशीही विचारविमर्श करणार आहे. त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्यात शांतता स्थापन करणे हा हेतू आहे. आम्ही येथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, असे तृणमूल काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी स्पष्ट केले. हे शिष्टमंडळ मणिपूरमध्ये शनिवारी सकाळी पोहचले. त्यानंतर त्यांनी भेटीगाठी केल्या.
शांतीचा संदेश देणार
येथे आम्ही शांतीचा संदेश पसरविणार आहोत. दोन्ही समाजांनी एकमेकांशी गुण्यागोविंदाने रहावे, असा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्यातील मतभेद सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. दोन्ही समाजांच्या बाजू समजून घेणे आवश्यक आहे. आम्हाला पक्षपात करायचा नसून समन्वय साधायचा आहे. दोन्ही समाज आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा शिष्टमंडळाने शनिवारी व्यक्त केली.









