पुणे / प्रतिनिधी :
मंत्रालयातील कोल्ड वॉरच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या आहेत. त्यात काहीही तथ्य नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेत्यांनी जबाबदारीने बोलायला हवे, असा निशाणाही त्यांनी वडेट्टीवार यांना लगावला.
मंत्रालयातील वॉर रूमचा मुद्दा उपस्थित करत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पवारांनी सुरू केलेल्या नव्या प्रोजेक्ट मॅनेजनमेंट युनिटवरुनही हल्लाबोल केला होता. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रसारमाध्यमांनीही थोडी खात्री करून बातम्या द्यायला हव्यात. मात्र, तसे होताना दिसत नाही. काल कोल्ड वॉरच्या बातम्या चालल्या. मात्र त्यात काहीच तथ्य नाही. मुळात मुख्यमंत्री स्वतःच प्रत्येक गोष्टीची माहिती घेत असतात. आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत ते जनतेच्या हितासाठी. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत.
मी अर्थमंत्री म्हणून बैठका घेऊ शकतो. तरीदेखील शेवटचा निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात. राधेश्याम मोपलवारही तिथे होते. मात्र तरीही नको त्या बातम्या चालल्या. आपल्याला काय त्रास होतो, हेच कळत नाही. सरकार कोणाचेही असो. अंतिम निर्णय हे सर्वोच्च असणारे मुख्यमंत्रीच घेत असतात, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पवार यांनी वडेट्टीवार यांचाही समाचार घेतला. विरोधी पक्षनेते काय बोलतात, हे त्यांनी लक्षात घ्यावे. त्यांचे पद महत्त्वाचे आहे. तेव्हा त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. मुख्यमंत्र्यांना थोडा त्रास झाला होता, म्हणून आम्हीच त्यांना विश्रांती घ्यायला पाठवले होते. त्यावेळी हवामान खराब असल्याने त्यांना तिथे पोहोचायला अडचण झाली. आजही चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटन सोहळय़ाला ते येणार नाहीत. विकासकामांना गती देण्यासाठी आढावा घेतला, की यंत्रणा जोमाने कामाला लागते. जनतेचे प्रश्न मार्गी लागतात. विरोधक मात्र काहीही बोलतात, असा टोला त्यांनी लगावला.








