देशभरात रस्त्यांवर उतरले लोक : एर्दोगान यांच्या दडपशाहीला विरोध
वृत्तसंस्था/अंकारा
तुर्कियेचे अध्यक्ष रेचेप तैयप एर्दोगान हे स्वत:च्या विरोधकांना संपवू पाहत असल्याचा आरोप होत आहे. तुर्कियेच्या पोलिसांनी एर्दोगान यांच्यासाठी राजकीय आव्हान ठरलेले नेते आणि देशातील सर्वात मोठ्या शहराचे महापौर इमामोग्लू यांना अटक केली आहे. आगामी अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी सर्व संभाव्य दावेदारांना स्वत:च्या मार्गातून दूर करणे आणि स्वत:च्या पुढील कार्यकाळाचा मार्ग प्रशस्त करणे हा एर्दोगान यांचा यामागील प्रयत्न असल्याचे मानले जातेय. इमामोग्लू यांना भ्रष्टाचार आणि दहशतवाद विरोधातील तपासाच्या अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे.
इमामोग्लू विरोधात कारवाई झाल्यावर तुर्कियेत विरोधी पक्ष भडकले आहेत. तुर्कियेच्या मुख्य विरोधी पक्षाने या कारवाईला ‘भावी अध्यक्षाच्या विरोधात सत्तापालट’ ठरविले आणि याची निंदा करत मोठ्या प्रमाणावर निदर्शनांचे आवाहन केले. महापौर इमामोग्लू यांच्याशी संबंधित आणखी 100 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात इस्तंबुल डिस्ट्रिक्ट मेयर रेसुल इम्रान साहन आणि मूरत कालिक यांचा समावेश आहे.
54 वर्षीय इमामोग्लू यांना काही दिवसांपूर्वी प्रमुख विरोधी पक्ष रिपब्लिकन पीपल्स पार्टीने अधिकृत स्वरुपा अध्यक्षीय उमेदवार घोषित केले होते. इमामोग्लू हे अनेक सर्वेक्षणांमध्ये एर्दोगान यांच्यापेक्षा लोकप्रिय ठरले आहेत. तुर्कियेचे लोक माझ्याविरोधात रचण्यात आलेल्या कटाला प्रत्युत्तर देतील. दबावासमोर मी मान झुकविणार नाही असे इमामोग्लू यांनी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पत्रात नमूद पेले आहे. तर एर्दोगान यांच्या न्याय मंत्र्याने इमामोग्लू यांना झालेल्या अटकेच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
तीव्र निदर्शने
एर्दोगान सरकारच्या कठोर भूमिकेनंतरही इस्तंबुलच्या साराचाने येथे हजारो लोक एकत्र आले, तेथे विरोधी पक्षाचे नेते ओजगुर ओजेल यांनी जमावाला संबोधित करत एर्दोगान यांनी निवडणुकीत पराभवाच्या भीतीने इमामोग्लू यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. इमामोग्लू यांच समर्थनार्थ राजधानी अंकारामध्ये देखील लोक रस्त्यांवर उतरले. जमावाने यावेळी एर्दोगान यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. इजमिर आणि ट्रॅबजोन शहरांमध्येही निदर्शने झाली आहेत.









