आपल्या आमदारांसह आयोध्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करताना विरोधी पक्षनेते अजित पवार अधिक आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री रोजच्या आणि ताज्या प्रश्नावरून लक्ष विचलीत करण्यासाठी फालतुगिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सातारा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निषाणा साधला ते म्हणाले, “प्रत्येकाला तीर्थक्षेत्राला जाण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री हे अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी गेले आहेत. जातीचा, धर्माचा वापर माणसांमध्ये फूट पाडण्यात, द्वेष पसरवण्यात कोणी करू नये. आम्ही कधीही इकडे जाणार, तिकडे जाणार अशी घोषणा केली नाही. मुख्यमंत्री राज्यातील महत्वाच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी फालतुगीरी करत आहेत.” असा थेट निशाणा मुख्यमंत्र्यांवर साधला.
ट्विटरवर त्यांच्यावर केलेल्या टिकेवर बोलताना अजित पवार म्हणाले, “कोणीही ट्विटरवरुन आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. आणि प्रत्येकाच्या ट्विटला उत्तर देण्यासाठी मी बांधील नसून असे तर रोज हौसे, नौसे, गौसे ट्विट करतील पण मी त्यांना बांधील नाही.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.