बहुमत नसतानाही महापौर निवडणुकीत भाजपचा विजय
► वृत्तसंस्था / चंदीगढ
केंद्रात भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विरोधी पक्षांच्या आघाडीला हरियाणा आणि पंजाबची राजधानी असणाऱ्या चंदीगढच्या महापौर निवडणुकीत मोठाच धक्का बसला आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे बहुमत भारतीय जनता पक्षाकडे नसतानाही या पक्षाचा या निवडणुकीत विजय झाला आहे.
भारतीय जनता पक्षाचे मनोज सोनकर हे 16 मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने संयुक्तरित्या कुलदीपसिंग यांना उमेवारी दिली होती. सिंग यांना केवळ 12 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत तब्बल 8 मते अवैध ठरली आहेत. त्यामुळे या दोन भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याचा हा प्रथमच प्रयोग या निवडणुकीत अपयशी ठरला आहे.
भाजपकडे केवळ 15 नगरसेवक
चंदीगढ महानगरपालिकेत निवडून आलेल्या सदस्यांची संख्या 36 आहे. त्यांनाच मतदानाचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाकडे केवळ 15 नगरसेवक आहेत. तर शिरोमणी अकाली दलाचा 1 सदस्य आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसकडे मिळून 20 सदस्य आहेत. तरीही या दोन पक्षांच्या युतीचा पराभव झाला. त्यांना सहज विजय मिळणे अपेक्षित होते. तथापि, युतीची आठ मते अवैध ठरली.
आरोप-प्रत्यारोप
निवडणूक अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर युतीची मते अवैध ठरविली, असा आरोप नंतर आम आदमी पक्षाने केला. पक्षांच्या प्रतिनिधींना मतगणनेच्यावेळी बोलाविण्यात आले नव्हते, असेही प्रतिपादन या पक्षाने केले आहे. तर भारतीय जनता पक्षाने आरोप खोडून काढला आहे. युतीच्याच अनेक सदस्यांना युती मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी आपले मत अवैध ठरेल अशा प्रकारे मतदान केले. यात निवडणूक अधिकाऱ्यांचा कोणताही दोष नाही. या निवडणुकीत नियमाप्रमाणे पक्षादेश काढला जाणार नव्हता, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाने दिले आहे.
प्रकरण न्यायालयात जाणार
निवडणूक अधिकाऱ्यांनी युतीच्या मतांमध्ये फेरफार केला आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला. तसेच या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले. मते का अवैध ठरविण्यात आली, याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही, असा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपत्रिकांवर पेनने खाणाखुणा करून ती अवैध ठरविली आहेत. तथापि, आम्ही हा पराभव स्वीकारलेला नाही, असे युतीचे म्हणणे आहे.
मतपत्रिकेच्या माध्यमातूनही विजय
भारतीय जनता पक्ष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात घोटाळे करून विजयी होतो, असा आरोप काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी अनेकदा केला आहे. मात्र, ही महापौरपदाची निवडणूक कागदी मतपत्रिकांवर झाली आहे. तसेच विरोधी पक्षांकडे स्पष्ट बहुमत असतानाही भारतीय जनता पक्ष विजयी झाला आहे. ही युतीच्या राजकारणाची शोकांतिका आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आलेली ही प्रथमच निवडणूक आहे.









