नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपतीपदासाठी होणार असलेल्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना विरोधकांचे उमेदवार म्हणून संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक आठवडय़ांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 27 जूनला सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी ते आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.
विरोधी पक्षांनी या निवडणुकीत संयुक्त उमेदवार द्यावा, यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी सर्व विरोधी पक्षांची बैठकही येथे आयोजित केली होती. मात्र, त्या बैठकीला बिजू जनता दल, वायएसआर काँगेस आणि तेलंगणा राष्ट्र समिती आदी मुख्य पक्ष अनुपस्थित होते. राष्ट्रवादी काँगेस, काँगेस, शिवसेना इत्यादी पक्षांसह 22 पक्षांची उपस्थिती होती. मात्र, नावावर तोडगा निघू शकला नव्हता.
तीन नेत्यांनी प्रस्ताव नाकारला
प्रथम राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचे संयुक्त उमेदवार बनण्यासाठी शरद पवारांना विचारणा करण्यात आली होती. तथापि, त्यांनी स्पष्ट नकार दिला. नंतर फारुख अब्दुल्ला आणि गोपालकृष्ण गांधी यांनीही उमेवारीचा प्रस्ताव नाकारला होता. म्हणून पुन्हा उमेदवारचा शोध घेण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. आता यशवंत सिन्हांच्या नावावर एकमत झाले असून त्यांनीही हा प्रस्ताव स्वीकारला असल्याने विरोधकांचा उमेदवाराचा प्रश्न सुटला आहे.
सिन्हांचे अभिनंदन
विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून निवड झाल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी यशवंत सिन्हा यांचे अभिनंदन केले. तसेच यशवंत सिन्हा यांच्या नावाला भाजप आणि रालोआनेही मान्यता द्यावी, असे आवाहन विरोधी पक्षांकडून करण्यात आले. तथापि, भाजप आणि रालोआकडून ते मानले जाण्याची शक्यता नाही.
सहमतीचे प्रयत्न असफल
भाजप आणि रालोआने निवडणूक टाळून सहमतीने राष्ट्रपती निवडले जावेत यासाठी प्रयत्न केले होते. विरोधी पक्षांशी बोलण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या नेतृत्वात समितीही स्थापन केली होती. तथापि, या समितीला सहमती घडविण्यात यश आले नाही, असे स्पष्टपणे दिसून येत आहे.
18 जुलैला निवडणूक
विरोधकांनी ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असल्याने आता ती होणार हे निश्चित झालेले आहे. त्यामुळे पुढचे राष्ट्रपती निर्विरोध असणार नाहीत, ही बाबही स्पष्ट झाली आहे. अद्याप सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांनी त्यांचा उमेदवार घोषित केलेला नाही. मात्र, तो येत्या काही दिवसांमध्ये निश्चित होण्याची शक्यता आहे, असे बोलले जाते.









