गेल्या आठवड्यात संसदेत काय बघायला मिळाले. अदानी प्रश्नावर काँग्रेसने सरकारवर दबाव चालूच ठेवला तेव्हा समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज चालू राहिले पाहिजे अशी भूमिका घेतली. कोणी एकाने आपले म्हणणे दामटणे बरोबर नाही. आमचे मुद्दे देखील पुढे आले पाहिजेत आणि त्याकरता संसद चालू राहिली पाहिजे असे सांगत त्यांनी एकप्रकारे काँग्रेसला झापलेच. अदानी हा राहुल गांधी यांचा जीवाभावाचा मुद्दा. पंतप्रधानाचे प्राण या ‘पोपटात’ आहेत अशी त्यांची समज.
तात्पर्य काय तर हरयाणा आणि महाराष्ट्रातील भाजपच्या विजयाने विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत परत एकदा चलबिचल सुरु झाली आहे. या आघाडीत हवशे, नवशे, गवशे सारेच घुसले असल्याने प्रत्येकजण आपल्या हिशोबानुसार गाडी दामटू पाहतोय आणि या साऱ्या प्रकारातून विरोधी आघाडीतील घालमेल वाढत आहे. सहा महिन्यापूर्वी कमजोर दिसणारे नरेंद्र मोदी आता तसे राहिलेले नाहीत. रात्रंदिवस आपल्या विरोधकांना आस्मान कसे दाखवायचे याचे मंथन करणारा भाजप इंडिया आघाडीकरता परत बागुलबुवा बनू लागला आहे. तुझे नी माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना. या म्हणीप्रमाणेच सध्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा कारभार सुरु आहे. हरयाणानंतर महाराष्ट्रातदेखील अनपेक्षितपणे काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने प्रादेशिक पक्षांना राहुल गांधींना बोधामृत पाजण्याचा एक चांगलाच चान्स मिळालेला आहे. लोकसभा निवडणुकीत 99 जागा मिळाल्यानंतर काँग्रेस फार उड्या मारायला लागले होते. त्यामुळे महाराष्ट्रात त्याला अपशकुन झाला ते बरेच झाले अशी भावना काही प्रादेशिक पक्षांची झालेली आहे तर काहींना आता पुढील वाटचालच अंधकारमय वाटत आहे. इंडिया आघाडीचा जन्म फार चांगल्या मुहूर्तावर झालेला आहे असे सध्या ज्या घटना घडत आहेत त्यावरूनतरी दिसत नाही. बंगालमधील विधानसभेच्या सहा पोटनिवडणुकांत भाजपचा पाडाव केल्यानंतर ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीचे प्रमुख बनवले पाहिजे अशी मागणी त्यांच्या एका निष्ठावंताने करून विरोधकांच्या मनात चालले आहे तरी काय? याची एक झलक दाखवली आहे. दीदींना जेव्हा नेतृत्व पाहिजे असते तेव्हाच इंडिया आघाडीची आठवण येते. निवडणुकात काँग्रेसशी समझोता करायला त्यांना आवडत नाही. आघाडीची घडी नीट बसवण्यासाठी कसे काम केले पाहिजे याबाबत देखील त्यांच्या काही सूचना नसतात. एकेकाळी ‘नरेंद्र मोदी चांगले आणि अमित शहा वाईट’ असा समज बाळगणाऱ्या ममतादीदी या वरकरणी आघाडीच्या आपण आहोत असे दाखवत असल्या तरी त्या एकप्रकारे भाजपचीच मदत करतात असा सूर काँग्रेसमध्ये ऐकू येतो. त्यात थोडा तथ्यांश जरूर आहे. वाजपेयींच्या काळात त्या काही काळ केंद्रात मंत्री देखील होत्या. अदानी लाचखोरी प्रकरणात सध्या संसदेत जो गदारोळ चालू आहे त्याबाबत भाजपला दोष न देता तृणमूल काँग्रेस हा काँग्रेसला लक्ष्य करत आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे सध्या गप्प आहेत ते उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकांतील पराभवामुळे. लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला चांगले यश मिळाल्यावर आता पुढील मुख्यमंत्री आपण बनलोच अशी त्यांची भावना झाली आणि तिनेच घात केला. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना धडा शिकवायचा होता कारण योगिनी सूचवलेले उमेदवार बहुतांशी नाकारले गेले होते. या पोटनिवडणुकांत काँग्रेसला कस्पटाप्रमाणे लेखून भिकाऱ्याला भीक देतात तशा नऊपैकी दोन जागा अखिलेशनी सोडल्या. कधी नव्हे ते राहुलनी शहाणपण दाखवून या जागांवर पाणी सोडून पक्षाचा पाठिंबा अखिलेशना जाहीर करून त्यांचे दात त्यांच्याच घशात घातले. अखिलेश यांचा पोटनिवडणुकीतील पराभव इंडिया आघाडीकरता इष्टापत्तीच ठरेल कारण 2027मध्ये योगी परत येतील असा बागूलबुवा मागे लागल्याने विधानसभा निवडणुकीत ते सर्वांना बरोबर घेतील. पुढील एकदोन महिन्यात दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यात काँग्रेसला आम्ही अजिबात जागा सोडणार नाही आणि स्वबळावरच लढणार असे अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसला देखील आम आदमी पक्षाबरोबर लढायचे नाही आहे. लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष बरोबर होते पण केजरीवाल यांनी काँग्रेसचा घात केला होता अशी भावना पक्षात आहे. हे दोन्ही पक्ष वेगळे लढत असल्याने सर्वात जास्त आनंद भाजपला झालेला आहे. काँग्रेस मुस्लिमबहुल जागा जिंकेल तर केजरीवाल यांची फसगत होईल असा भाजपचा अंदाज आहे. तो किती बरोबर अथवा फसवा ते येणारा काळ दाखवेल. सद्य 70-सदस्यीय दिल्ली विधानसभेत भाजपकडे केवळ 8 जागा आहेत तर उरलेल्या 62 या आम आदमी पक्षाकडे आहेत, काँग्रेसला गेली दहा वर्षे हातात भोपळा आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीतील दणदणीत पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडणे सुरु केलेले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेमधून उखडण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचा घाट भाजप घालेल. अशावेळी काँग्रेसशी समझोता नको अशी मागणी ठाकरे यांच्या पक्षात वाढीस लागली आहे. सहा महिन्यापूर्वीपर्यंत काँग्रेसचा ‘नवीन लालू’ अशी ख्याती झालेली ठाकरेंची सेना फारच अडचणीत आलेली आहे आणि अशा वेळेला काँग्रेसच्या नावे दुगाण्या सोडण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताच उपाय नाही. छोट्याशा झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना चांगले यश मिळाले तेव्हा काँग्रेसने शेफारून जाऊन उपमुख्यमंत्रीपद मागितले पण त्याच्या या प्रस्तावाला केराची टोपली दाखवण्यात आली. वायनाडच्या पोटनिवडणुकीत डाव्या पक्षांचा, विशेषत: मार्क्सवादी पक्षाचा, काँग्रेसवरील राग उफाळून आला. वर्ष-दीड वर्षात केरळमधील विधानसभा निवडणूक आहे त्यात काँग्रेसचं सत्ताधारी डाव्या आघाडीचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे. इंडिया आघाडीत सुरु झालेल्या या बेदिलीने भाजप खूष झालेला आहे आणि आता या आघाडीची शंभरी भरली अशी भाकिते करत आहे. संसदेचा वापर काँग्रेसविरुद्ध खोटा नाटा प्रचार करण्यासाठी केला जात आहे. एकमात्र खरे की या आघाडीत नवीन जान भरणे जरुरी आहे. पुढील लोकसभा निवडणूक वेळापत्रकानुसार साडेचार वर्षे दूर असली तरी प्रत्यक्षात मोदींच्या मनात काय चालले आहे याचा कोणालाच पत्ता नाही. कुबड्याच्या सहाय्याने फार चालणे मोदींच्या स्वभावाला धरून नाही. त्यामुळे विरोधक पांगलेले आणि पांगुळलेले असताना ते अचानक लोकसभा निवडणुकीचा जुगार पुढील वर्ष-दीड वर्षात उडवू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
भाजपला आपण स्वत: रोखू शकतो हे जो पर्यंत काँग्रेस सिद्ध करू शकत नाही तो पर्यंत गैर भाजप प्रादेशिक पक्ष इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेसला देऊ शकत नाहीत. प्रादेशिक पक्षांच्या ताकतीवर आपण भाजपला हरवू आणि आपण राष्ट्रीय पक्ष असल्याने बाकीच्यांनी आपले नेतृव स्वीकारावे असा हट्ट, अशी समजूत भ्रामक असते. समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आप, राष्ट्रीय जनता दल, बसपा हे भाजपशी लढतील कारण त्यांना लढावेच लागते पण यात काँग्रेसला सोबत घेऊन त्याची ताकत त्यांना वाढवायची नाही. म्हणून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि आता महाराष्ट्रातदेखील काँग्रेसला उभारी घ्यावी लागेल. ‘साला मै तो साब बन गया’ असे समजून चालणार नाही. त्याकरिता घाम गाळावा लागेल. शक्ती आणि युक्तीने काम करावे लागेल. बाळबोध पद्धतीने काम करून चालणार नाही. कासी महाठक व्हावे लागेल. जोपर्यंत हे होत नाही तोवर नवी दिल्लीवर कब्जा करणे काँग्रेसकरता ‘मुंगेरी लाल के हसीन सपने’ राहतील.
सुनील गाताडे








