काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी चालवलेल्या ‘काँग्रेसेतर आघाडी’च्या प्रयत्नांवर काँग्रेसने प्रथमच भाष्य केले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रविवारी एका मुलाखतीत बोलताना काँग्रेसशिवाय कोणतीही विरोधी आघाडी मजबूत नसल्याचे स्पष्ट केले. तुम्ही कितीही आघाड्या काढल्या तरी त्यात काँग्रेस असणे आवश्यक असल्याचे ते पुढे म्हणाले. दुसरीकडे, संसदीय कामकाजाबाबत बोलताना विरोधकांना संसदेत बोलू दिले पाहिजे. हा लोकशाहीचा पाया आहे, पण विरोधी पक्षाच्या नेत्यांना अजिबात बोलू दिले जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
तृणमूल काँग्रेस, समाजवादीची बैठक ही मोठी गोष्ट नाही. लोक असेच भेटत राहतात. स्थानिक राजकीय परिस्थितीनुऊप आघाड्या बनत राहतात. तिसरी आघाडी, चौथी आघाडी, पाचवी आघाडी बनत राहतील पण विरोधी पक्षात काँग्रेस असणे आवश्यक आहे. विरोधी संघटन झाल्यास त्यात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असेल. काँग्रेसशिवाय विरोधी आघाडी शक्मय नसल्याचे ते म्हणाले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आत्ताच आघाडी तयार करणे खूप घाईचे आहे. सध्या कर्नाटकात निवडणुका आहेत, त्यानंतर तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराममध्ये निवडणुका होतील. 2023 मध्ये आम्ही राज्यांच्या निवडणुकांमध्ये लक्ष घालणार असून 2024 च्या निवडणुकांबाबत विचार करण्यास अजूनही वेळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
…तर लोकशाही कशी टिकणार?
संसदेतील कामकाज ठप्प असल्याच्या मुद्द्यावरही रमेश यांनी परखड भाष्य केले. विरोधकांना बोलू दिले नाही तर लोकशाही कशी टिकणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अदानी, चीन, आर्थिक मुद्यांवर चर्चा होऊ दिली जात नसेल तर देशात लोकशाही असल्याचे कसे म्हणता येईल? असा प्रश्नही विचारला.









