मंगेश भस्मे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील पुलाजवळील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार व पाली येथील तरुण उद्योजक मंगेश मधुकर भस्मे यांचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात शनिवारी 28 जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला. दुचाकीस्वार भस्मे हे पालीहून रत्नागिरीकडे येत होते, हातखंबा हायस्कूलजवळ महामार्गावरील वळणावर समोरून येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत भस्मे यांच्या दुचाकीचा चक्काचूर होऊन ते जागीच कोसळले.
अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगण्यात येते. या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्ग वाहतूक केंद्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, हेडकॉन्स्टेबल गमरे, दोरखंडे, कॉन्स्टेबल शिंगाडे आदी घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातामुळे हातखंबा येथे महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती. ती पोलिसांनी सुरळीत केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. अपघातग्रस्त वळण आणि प्रशासनाच्या ढिसाळ भूमिकेबाबत वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याचे याकडे दुर्लक्ष होत असून, नागरिकांच्या जिवाशी खेळ चालू आहे का? असा संतप्त सवाल वाहनचालक, नागरिकांमधून विचारला जात आहे.
‘त्या’ वाहनाचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी
मंगेश भस्मे हे रत्नागिरीतील एक नामांकित प्रिंटर मेकॅनिक होते. ते ‘बायनरी वर्ल्ड’ या नावाने जुना माळनाका येथे प्रिंटर सर्व्हिस स्टेशन चालवत होते. अत्यंत शांत स्वभावाचे आणि सचोटीने व्यवसाय करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या निधनाने एक कार्यक्षम आणि मनमिळाऊ व्यावसायिक गमावल्याने साऱ्यांना धक्का बसला. त्यांच्या मृत्यूमुळे मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने अज्ञात वाहनाचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
हलगर्जीपणामुळे जाताहेत निरपराधांचे जीव
मुंबई-गोवा महामार्गाचे हातखंबा-पाली दरम्यानचे काही भागाचे काँक्रीटीकरण झाले असले तरी उर्वरित भागात मोठ्या प्रमाणावर रस्ते खड्डेमय आणि धोकादायक स्थितीत आहेत. ठेकेदार कंपनीकडून कामाच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अपघातांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे निरपराधांच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग घडत आहेत.
हातखंबा परिसरात लागोपाठ दोन धोकादायक वळणे अनेक अपघातांसाठी हॉटस्पॉट बनला असून, तेथील अऊंद रस्ता, चिखलयुक्त वळणं, खड्डे आणि पावसामुळे वाढलेली धोकादायकता यामुळे वाहनचालकांचे जीव टांगणीला लागले आहेत. त्यातच आता ठेकेदार कंपनीने नव्याने निर्माण केलेले महाविद्यालयाजवळील चढणीचे वळण अपघातांना निमंत्रण देत आहे.








