ईशान्येतील 3 राज्यांमध्ये काम सुरू नाही : नागा संघटनांचा इशारा : अरुणाचल प्रदेशात होतेय सर्वेक्षण
वृत्तसंस्था/इंफाळ
म्यानमारला लागून असलेल्या ईशान्येतील 4 राज्यांमधील 1643 किलोमीटर लांब सीमेवर काटेरी कुंपण लावण्याच्या प्रकल्पाला विरोध सुरू झाला आहे. याचमुळे 4 पैकी 3 राज्यांमध्ये अद्याप काम सुरु होऊ शकलेले नाही. तर मणिपूरमध्ये आतापर्यंत 37 किलोमीटर लांबीच्या सीमेपर्यंतच कुंपण उभारण्यात आले आहे. नागालँड, मिझोरममध्ये स्थानिक संघटना या प्रकल्पाच्या विरोधात उतरल्या आहेत. नागांची सर्वात मोठी संघटना युनायटेड नागा कौन्सिलने (युएनएसी) या प्रकल्पात काम केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा स्थानिक लोकांना दिला आहे. मिझोरम अन् नागालँडमध्ये कुंपणासाठी सर्वेक्षणही सुरू होऊ शकलेले नाही. अरुणाचल प्रदेशात सर्वेक्षण होत आहे.मणिपूरच्या टेंगनाउपोलमध्ये म्यानमारला लागून असलेल्या फाइको आणि थाना गावात लोक काटेरी कुंपणाच्या विरोधात होते, परुंत टीमने सर्वेक्षण रोखले नाही. आता येथील नागाबहुल भागांमध्ये कुंपणाला विरोध होत असल्याचे बीआरओच्या अधिकाऱ्याने सांगितले.
31 हजार कोटीचा प्रकल्प
बीआरओनुसार 4 राज्यांमधील 1500 किलोमीटर लांब सीमेवर काटेरी कुंपण अन् रस्ते निर्मितीचे काम केले जाणार असून याकरता 31 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. 20 हजार कोटी रुपये कुंपण तर उर्वरित निधी रस्तेनिर्मितीवर खर्च होणार आहे. 143 किलोमीटरच्या भागात दुर्गम खोरे अन् नद्यांचे क्षेत्र असल्याने तेथे कुंपण तयार करणे अवघड आहे. म्यानमारची सर्वाधिक लांब 520 किलोमीटरची सीमा अरुणाचलला लागून आहे. मिझोरममध्ये 510 तर मणिपूरमध्ये 398 आणि नागालँडमध्ये 215 किलोमीटर लांबीच्या सीमेवर कुंपण उभारण्यात येईल.
विरोधामागील कारण
सीमेवर कुंपण उभारण्यास विरोध पूर्वीपासूनच सुरू होता, परंतु बीआरओचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन आणि अन्य प्रमुख अधिकाऱ्यांनी इंफाळ येथील राजभवनात मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यावर संघटनेने विरोध तीव्र केला आहे. मुक्त संचार करार रद्द करणे आणि कुंपण उभारण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन मिझो जिरलाई पाल या विद्यार्थी संघटनेने केले आहे. शतकांपूर्वी येथे कुठलीच सीमा नव्हती. आमची वांशिक आणि ऐतिहासिक स्थळे म्यानमारच्या चिन राज्यात आहेत. कुंपण हा वारसा संपुष्टात आणेल, याचमुळे आम्ही याच्या विरोधात आहोत. आमच्या मुलांना विभागताना पाहू शकत नाही असे एमजेडपीचे महासचिव थोमटे यांनी म्हटले.
नागांना विभागू देणार नाही
ज्या भूमीवर कुंपण उभारण्यात येत आहे, ती आमच्या पूर्वजांची असल्याचे नागा पीपल्स फ्रंटचे महासचिव एस. कासूंग यांनी म्हटले आहे. तर काटेरी कुंपण आमच्यासाठी बर्लिनची भिंत ठरेल अशी टिप्पणी नागा स्टुडंट्स फेडरेशनचे वरिष्ठ नेत एशुओ क्रेलो यांनी केली आहे. सरकारच्या कुंपणाच्या योजनेद्वारे नागांना विभागू देणार नाही असे नागा कौन्सिलने म्हटले आहे.









