आनंद महिंद्रा यांचे ट्विट ः अनुभवाचा फायदा घेणार असल्याची स्पष्टोक्ती
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अग्निवीरांना केंद्रीय गृह आणि संरक्षण खात्यातील विविध पदांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील काही नामवंतांनी पुढे येत अग्निवीरांना नोकरीची सुसंधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. देशातील दिग्गज उद्योगपतींनी अग्निपथ योजनेच्या समर्थनार्थ उभे राहण्यास सुरुवात केली आहे. आनंद महिंद्रा यांनी या योजनेचे कौतुक करत या योजनेंतर्गत चार वर्षे देशसेवा केल्यानंतर येणाऱया अग्निवीरांना महिंद्रा ग्रुपमध्ये नोकरी देण्याची घोषणा केली. महिंद्रा समूह प्रशिक्षित आणि सक्षम अग्निवीरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल, असे ट्विट त्यांनी केले.
अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर होत असलेल्या हिंसाचारामुळे मी अत्यंत दुःखी आणि निराश झालो असल्याचे महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर नमूद केले. गेल्यावषी जेव्हा या योजनेचा विचार केला जात असताना अग्निवीरांना मिळणारी शिस्त आणि कौशल्य त्यांना नक्कीच रोजगारक्षम बनवेल, असे आपण म्हटल्याची आठवणही त्यांनी करून दिली आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रात अग्निवीरांसाठी मोठय़ा प्रमाणावर रोजगाराच्या संधी आहेत. नेतृत्व क्षमता, टीमवर्क आणि शारीरिक पराक्रमाने सुसज्ज तरुण उद्योगाला पुढे नेण्यासाठी काम करतील. हे युवक इंटस्ट्रीयल वर्क्सपासून मॅनेजमेंट आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटपर्यंतच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मतही व्यक्त करण्यात आले आहे.









