मध्यप्रदेशातील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, भाजपला विजयी करण्याच आवाहन
► वृत्तसंस्था / भोपाळNew
ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी केवळ अनिच्छेनेच पाठिंबा दिला आहे. हे विधेयक संमत व्हावे अशी खरेतर त्यांची इच्छा नव्हती. हेच विरोधक सत्तेवर असताना त्यांनी अनेकदा हे आरक्षण देण्याचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. पण आता त्यांच्यावर महिलांचाच दबाव असल्याने त्यांना या विधेयकाला इच्छा नसतानाही समर्थन द्यावे लागले. आता दांभिक भूमिका घेऊन याचे श्रेय विरोधक घेऊ पहात आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यात सोमवारी भाषण करीत होते. मध्यप्रदेश काँग्रेसच्या हाती गेल्यास तो पक्ष त्याचे आजारी राज्य बनवेल. येथे भाजपचे राज्य आहे ही राज्यासाठी भाग्याची बाब आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपलाच विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता कसून कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या ‘घमंडिया’ आघाडीत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करण्याचे धाडस नव्हते. त्यामुळे पाठिंबा द्यावा लागला, अशी टिप्पणी त्यांनी केली.
काँग्रेस हे गंजलेले लोखंड
काँग्रेस पक्षाची अवस्था गंजलेल्या लोखंडाप्रमाणे आहे. तो पक्ष अशा लोखंडाप्रमाणेच झिजून नाहीसा होणार आहे. या पक्षाला भ्रष्टाचार आणि लांगूलचालन यांचा मोठा इतिहास आहे. भारताच्या प्रगतीसंबंधी हा पक्ष नेहमी नकारात्मक प्रचार करतो. त्याला ही प्रगती सहन होत नाही. काँग्रेस पक्षाकडे विकासाची कोणतीही धोरणे नसून तो देशाला 20 व्या शतकापर्यंत मागे ढकलू पहात आहे. या पक्षाला जनता धडा शिकवेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांची भूमिका केवळ अडथळे निर्माण करण्याची आहे, अशी टीका त्यांनी केले. काँग्रेसचा दृष्टीकोन नेहमी भाजपला पाण्यात पाहण्याचा आहे. या पक्षाला सत्तेवाचून फारकाळ करमत नाही. येन केन प्रकारेण सत्ता मिळविण्याचा त्याला प्रयत्न आहे. त्यामुळे जनतेने या पक्षापासून सावध रहावे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
महिलांच्या जीवनात परिवर्तन
भाजपच्या जनताभिमुख धोरणांमुळे महिलांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, गरीब आणि शोषित महिला भाजपच्या कल्याणकारी योजनांच्या सर्वात मोठ्या लाभार्थी बनल्या आहे. आजवर त्यांच्या आवश्यकतांचा कोणीही विचार केला नव्हता. त्यांचाच आज लाभ होत आहे. विरोधकांचे काम केवळ टीका करण्याचे आहे. त्यांनी संसदभवनाची नवी वास्तू निर्माण करायलाही विरोध केला होता. महामार्ग बांधणी आणि रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीरणातही त्यांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
गरीब म्हणजे अॅडव्हेंचर टुरीझम
काँग्रेस पक्षाला गरीबांचे जीवन म्हणजे ‘अॅडव्हेंचर टुरिझम’ आणि सहल करण्याची संधी वाटते. म्हणून या पक्षाचे नेते गरीब शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन देखावा निर्माण करतात. त्यांच्यासाठी ती केवळ छायाचित्र काढण्याची संधी असते. त्यांना गरीबांविषयी कोणतीही आस्था नाही. तसे सत्तेवर असताना त्यांनी गरीबांसाठी काहीही भरीव केले नाही, असा घणाघात त्यांनी केला.
निवडणूक प्रचाराचे रणशिंग
ड भोपाळ येथे पंतप्रधान मोदींनी फुंकले आगामी निवडणुकांचे रणशिंग
ड काँग्रेसला गरीबांविषयी केवळ तोंडदेखली आस्था असण्याचा आरोप
ड भाजपच्या कल्याणकारी योजनांमुळे गरीब, शोषित महिलांचा लाभ









