पाटण्यातील बैठकीकडे देशाचे लक्ष : किती पक्ष सहभागी होतात याचे औत्सुक्य
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारची राजधानी पाटणा येथे 23 जून रोजी होणाऱ्या विरोधकांच्या मेगा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गुरुवारपासूनच विरोधी पक्षांचे नेते पाटण्याला पोहोचण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासह अन्य काही नेतेही बिहारमध्ये दाखल झाले असून बैठकीमध्ये एकूण किती पक्ष सहभागी होतात याचीच सर्वांना उत्सुकता आहे. एकंदर, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या चार-पाच महिन्यांपूर्वीपासून सुरू केलेल्या प्रयत्नांना कितपत यश मिळते याची प्रचिती शुक्रवारच्या बैठकीअंती दिसून येणार आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बैठकीच्या निमित्ताने आपल्या राज्यात येणाऱ्या नेतेमंडळींसाठी उत्तम व्यवस्था केली आहे. दुपारच्या मेजवानीत त्यांना बिहारी पदार्थ दिले जातील. बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत होणाऱ्या बैठकीला नितीशकुमार यांच्यासह ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, फाऊख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहण्याची शक्मयता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व नेते राज्य अतिथीगृहात राहणार आहेत. त्यांच्यासोबत येणाऱ्या लोकांसाठी पाटण्याच्या अनेक हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी विरोधी पक्षनेत्यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बैठकीपूर्वी केलेल्या वक्तव्यांमुळे ‘आम आदमी पक्षा’च्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र, शुक्रवारच्या पहिल्या बैठकीमध्ये ते सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यासोबत खासदार संजय सिंह आणि राधव चढ्ढा हेही पाटण्यात येणार आहेत. पाटण्याला आल्यानंतर पटना तख्त श्री हरमंदिर साहिब गुऊद्वारात जाऊन तेथे दर्शन घेतील.
ममता बॅनर्जी पोहोचल्या लालूंच्या निवासस्थानी
विरोधकांच्या बैठकीच्या निमित्ताने गुरुवारी दुपारीच बिहारमध्ये पोहोचलेल्या ममता बॅनर्जी यांनी आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांची भेट घेतली. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास लालूंच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर ममतादीदींनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. लालू कुटुंबीयांशी आमचे पूर्वीपासून निकटचे सबंध असल्यामुळे सुरुवातीला आपण त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्याला आनंद झाल्याचेही त्या म्हणाल्या. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून येत्या निवडणुकीत आम्ही एकत्रित लढण्याचा संकल्प केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत अभिषेक बॅनर्जीही उपस्थित होते. विरोधकांची बैठक आटोपल्यानंतर ममता बॅनर्जी शुक्रवारी दुपारी 4 वाजता बंगालला परतणार आहेत. दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी आज म्हणजेच 23 जून रोजी पाटणामध्ये दाखल होण्याची शक्मयता आहे. त्यांच्याशिवाय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल हेही पाटण्यात येणार आहेत. याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव गट) उद्धव ठाकरे, सपाचे नेते अखिलेश यादव यांच्यासह इतर नेते 23 जूनलाच पाटण्याला पोहोचण्याची शक्मयता आहे.









