संस्था लुटत आहेत, गोकुळ त्याचच उदाहरण असल्याचा केला आरोप
कोल्हापूर प्रतिनिधी
विरोधकांना सहकारी संस्था चालविण्याचे ज्ञान नाही. ते केवळ सहकारी संस्था लुटण्याच काम करत आहेत. गोकुळ दूध संघ हे त्याचे उदाहरण आहे, आहे असा आरोप गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केला.
छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीची गुरुवारी वंदूर येथे प्रचार सभा झाली याप्रसंगी गोकुळ संचालिका महाडिक बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसिंग घाटगे होते.
संचालिका महाडिक म्हणाल्या, ज्यांनी खासगी शिक्षण संस्था निर्माण करुन देवस्थानच्या जमिनी लाटल्या, कधी गोरगरीब अथवा जिल्ह्याच कल्याण केलं नाही, अशा माणसांची नियत ओळखा. विरोधकांनी राजाराम कारखान्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना सत्ताधाऱ्यांनी सडेतोड उत्तरे दिली. मात्र आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना विरोधक नजर नव्हे चेहराही लपवत असल्याचा टोला महाडिक यांनी लगावला. तसेच माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सभासदांच हित जोपासत कारखाना उत्तम प्रकारे चालवला आहे. त्यामुळे कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहण्यासाठी सत्ताधारी आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन महाडिक यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ सभासद केरबा चौगुले, ऋतुराज घाटगे, विक्रमसिंह घाटगे, राजाराम मोरे, संजय मगदूम, तानाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेस विजय पाटील, कोंडीबा लोकरे, श्रीमंतीनी घाटगे, उत्कर्षा देशमुख यांच्यासह सभासद ग्रामस्थ उपस्थित होते.