पाटण्यातील बैठकीत 15 पक्षांचा सहभाग : शिमल्यात 12 जुलैला आगामी रणनीती ठरवणार महाआघाडी…
वृत्तसंस्था/ पाटणा
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकजूट करण्यात गुंतलेल्या विरोधी पक्षांची शुक्रवार, 23 जून रोजी पाटणा येथे बैठक झाली. यानंतर विरोधकांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत आमचे एकत्र येणे देशाच्या हिताचे असल्याचे प्रतिपादन केले. 2024 ची लोकसभा निवडणूक एकजुटीने लढण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला असून त्याची सविस्तर रणनीती लवकरच ठरविली जाणार आहे. येत्या 12 जुलै रोजी विरोधी पक्षांची शिमल्यात पुढील बैठक होणार आहे.
पाटण्यात भाजपविरोधी पंधरा राजकीय पक्षांची मोठी बैठक शुक्रवारी झाली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांनी आपली मते मांडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांमधील समन्वयासाठी नितीशकुमार यांची राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्ती करण्याबाबतही चर्चा झाली. यासोबतच सर्व पक्षांचा समान किमान कार्यक्रम करण्यावरही चर्चा झाली. जवळपास पाच तास चाललेल्या बैठकीनंतर सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याप्रसंगी आम्ही समान अजेंडा ठरवत असल्याचे जाहीर केले.
नितीशकुमार यांच्या उद्घाटनपर भाषणाने बैठकीला प्रारंभ झाला. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी आपापले मुद्दे मांडले. सर्व पक्षांना सोबत घेण्याची जबाबदारी नितीशकुमार यांच्याकडे द्यावी, अशीही चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते. त्यादृष्टीने नितीशकुमार यांना राष्ट्रीय संयोजक बनवले जाऊ शकते. आतापर्यंत त्यांनीच सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नितीशकुमार यांच्या पुढाकाराने कट्टर विरोधकांनीही भाजपशी लढण्यासाठी एकत्र येण्याचे मान्य केले आहे.
15 पक्षांचे 27 नेते सहभागी
पाटण्यातील बैठकीत 15 पक्षांचे 27 नेते सहभागी झाले होते. या नेत्यांमध्ये नितीशकुमार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, मल्लिकार्जुन खर्गे, भगवंत मान, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, उद्धव ठाकरे, शरद पवार, लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव, सीताराम येचुरी, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, टी. आर. बालू, डी राजा, तेजस्वी यादव, के. सी. वेणुगोपाल, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, मनोज झा, फिरहाद हकीम, प्रफुल्ल पटेल, राघव चढ्ढा, संजय सिंह, संजय राऊत, राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग, अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओब्रायन, दीपंकर भट्टाचार्य यांचा सहभाग होता.
…जेथे काँग्रेस उपस्थित, तेथे ‘आप’ अनुपस्थित!
केजरीवालांचा नितीशकुमारांना धक्का
नितीशकुमारांच्या महाआघाडीच्या प्रयत्नांना आम आदमी पक्षाच्या बाजूने जोरदार झटका बसताना दिसत आहे. आम आदमी पार्टीने शिमला येथील बैठकीत सहभागी होणाऱ्या सर्व राजकीय पक्षांसमोर मोठी अट ठेवली आहे. पुढील बैठकीत काँग्रेस पक्ष सहभागी झाल्यास आम आदमी पक्ष बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याचे केजरीवाल यांनी शुक्रवारी जाहीर केले. पाटणा येथील बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत सहभागी न होता, आम आदमी पक्षाने एक निवेदन जारी करत पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याने नितीशकुमारांची डोकेदुखी वाढली आहे.
आम आदमी पक्षाने जारी केलेल्या निवेदनानुसार, जोपर्यंत काँग्रेस काळ्या अध्यादेशाला जाहीर विरोध करत नाही आणि राज्यसभेत त्यांचे सर्व 31 खासदार राज्यसभेत या अध्यादेशाला विरोध करणार असल्याचे जाहीर करत नाही, तोपर्यंत आम्ही विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. पाटणा येथे विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर आम आदमी पक्षाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या 15 पक्षांपैकी 12 पक्षांचे राज्यसभेत खासदार आहेत. या 12 पक्षांपैकी 11 पक्षांनी अध्यादेशावर आपली भूमिका स्पष्ट केली असून अध्यादेशाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, केवळ काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
राहुल गांधी शादी करें, हम सब बाराती होंगे!
संयुक्त पत्रकार परिषदेत आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी राहुल गांधींना दिलेल्या सल्ल्याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. ‘राहुल गांधी शादी करें, हम सब बाराती होंगे’ असे भाष्य करताच सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य उमटले. राहुल गांधी नवरा बनले तर आम्ही वऱ्हाडी होऊ, असे लालू म्हणाले. तसेच राहुल गांधींना दाढी कापून लग्न करण्याचा सल्ला देतानाच सोनियाजींनाही राहुल गांधींनी लग्न करावे असे वाटते, असे ते पुढे म्हणाले.
बैठकीत अनेक मुद्यांवरून मतभेद
केजरीवाल-ओमर अब्दुल्लांमध्ये खडाजंगी : शरद पवार-उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
पाटण्यात झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत परस्पर वादही पाहायला मिळाले. बैठकीत सर्व पक्षांचे नेते एकत्र आले, मात्र काही मुद्यांवरून त्यांच्यात वाद झाला. विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या बैठकीत दिल्लीच्या मुद्यावर काँग्रेस आणि भाजपने हातमिळवणी केल्याचा आरोप ‘आप’ने केला. शेवटी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला ‘आप’चे नेते गैरहजर राहिले. इतकेच नाही तर या बैठकीत ओमर अब्दुल्ला आणि केजरीवाल यांच्यात मतभेद दिसून आले. दिल्लीबाबत केंद्राने आणलेल्या अध्यादेशाला अन्य पक्षांनीही विरोध केला पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले. त्यामुळे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आक्षेप घेतला. जेव्हा काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले, तेव्हा तुमच्या पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला नाही, असे अब्दुल्ला म्हणाले. त्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मतभेद सोडवण्यासाठी पुढे आले. विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र येऊन मतभेद मिटवावे लागतील, असे ते म्हणाले.
अध्यादेश पाठिंब्यासाठी केजरीवाल आग्रही
बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली अध्यादेशावर सर्वांचे सहकार्य मागितल्याचेही कळते. त्यांच्या मागणीनंतर काँग्रेसने आपली भूमिका अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे. सध्याच आपण स्पष्टीकरण देणार नसून याबाबत संसदेतच योग्य भूमिका मांडण्याचा विचार काँग्रेसने चालवला आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांनी काँग्रेसला दिल्ली अध्यादेशाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. मात्र, काँग्रेसने अद्याप निश्चित पवित्रा जाहीर केलेला नाही.
2024 मध्ये एकजुटीने लढावे लागेल : खर्गे
आगामी लोकसभा निवडणूक सर्व विरोधी पक्षांना एकत्र येऊन लढायची आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीपूर्वी सांगितले. राहुल गांधीही याबाबत सकारात्मक असून बैठकीमध्ये सर्व नेत्यांशी चर्चा करून त्यानुसार पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले. आम्ही पक्षाची तत्त्वे आणि विचारधारा कधीही सोडू शकत नाही. जर आपण बिहार जिंकलो तर संपूर्ण भारत जिंकू असे मत व्यक्त करतानाच किरकोळ मतभेद विसरून देश आणि संविधान वाचवण्यासाठी आता खरा लढा सुरू होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना भारतात विचारधारेची लढाई सुरू असल्याचे सांगितले. एका बाजूला काँग्रेसची ‘जॉईन इंडिया’साठी धडपड सुरू असताना दुसरीकडे भाजप आणि आरएसएसची ‘ब्र्रेक इंडिया’ची विचारधारा लादली जात आहे. त्यामुळेच आम्ही बिहारमध्ये आलो असून काँग्रेस पक्षाचा डीएनए बिहारमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘भारत जोडो यात्रे’मधील उत्स्फूर्त सहभागाबद्दल त्यांनी बिहारच्या जनतेचे आभारही मानले.
जागावाटपावर चर्चा नाही
विरोधी पक्षांची बैठक आटोपल्यानंतर नितीश चांगलेच खुश दिसत होते. पहिली बैठक यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व पक्षांनी एकजूट दाखवली असून कोणतेही मतभेद व मनभेद समोर आलेले नाहीत. आज जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. जुलैमध्ये शिमला येथे होणाऱ्या पुढील बैठकीत यावर चर्चा होईल, असे ते म्हणाले.
संयुक्त पत्रकार परिषदेला केजरीवालांची दांडी
पाच तास चाललेल्या बैठकीनंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महत्त्वाच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. याप्रसंगी नितीशकुमार यादव, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, लालन सिंह, दीपंकर भट्टाचार्य, सीताराम येचुरी, डी. राजा, उद्धव ठाकरे, मेहबुबा मुफ्ती, शरद पवार उपस्थित होते. मात्र, या बैठकीला अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित राहणे टाळले









