‘अॅपल’च्या स्पष्टीकरणानंतर विरोधकांचीच कोंडी
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘अॅपल’ कंपनीच्या मोबाईल अलर्टमुळे अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर मोबाईल हॅकिंग करत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, अॅपल कंपनीने त्वरित स्पष्टीकरणाचा संदेश दिल्याने विरोधकांची कोंडी झाल्याचे पहावयास मिळत आहे. घाईगडबडीने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवून विरोधकांनी स्वत:चेच हसे करून घेतले अशी प्रतिक्रिया अनेक तज्ञांनी व्यक्त केली असून भारतीय जनता पक्षाने अशा कोणत्याची हेरगिरीची शक्यता पूर्णत: फेटाळली आहे.
मंगळवारी सकाळपासूनच अनेक विरोधी पक्षनेत्यांची धावपळ झालेली दिसून येत होती. कारण त्यांच्या आयफोनवर एक संदेश आलेला होता. सरकार प्रणित सॉफ्टवेअरच्या साहाय्याने आपला मोबाईल हॅक करण्यात येत असून त्याद्वारे हेरगिरी करण्यात येत आहे, अशी सावधानतेची सूचना करणारा हा संदेश होता. त्यातील, सरकारप्रणित हा शब्द उचलून धरत अनेक विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविण्यास प्रारंभ केला. सरकार आमच्या मोबाईल संभाषणांवर बेकायदेशीरीरत्या पाळत ठेवत आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी, शशी थरुर, सीताराम येच्युरी, तृणमूल काँग्रेसच्या वादग्रस्त नेत्या मऊवा मोईत्रा इत्यादी नेत्यांनी करून केंद्र सरकारला धारेवर धरण्यास प्रारंभ केला होता.
गांधींची पत्रकार परिषद
आयफोनवर आलेल्या या संदेशाचा स्क्रिन शॉट दाखविण्यासाठी राहुल गांधी यांनी विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. केंद्र सरकार विरोधी पक्षनेत्यांवर हेरगिरी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी माझा मोबाईल तपासणीसाठी देण्यास तयार आहे. मी हेरगिरीला घाबरत नाही. केंद्र सरकारला पाहिजे तेवढी हेरगिरी करु देत. जेव्हा आम्ही अदाणींवर आरोप करतो, तेव्हा केंद्र सरकार आमच्यावर हेरगिरी सुरु करते, असाही आरोप त्यांनी केला.
इतरही नेत्यांचे आरोप
काँग्रेस नेत्यांसह तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आदी पक्षांच्या किमान सात नेत्यांनी आपल्याला असे संदेश आल्याचे स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार विरोधी पक्षांचे ऐक्य तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ते बेकायदेशीर मार्गांचा उपयोग करीत आहे, इत्यादी आगपाखड त्यांनी केली.
‘अॅपल’कडून त्वरित स्पष्टीकरण
आयफोनची निर्मिती करणाऱ्या अॅपल कंपनीने या सर्व गोंधळावर त्वरित स्पष्टीकरण देणारे वक्तव्य सादर केले आहे. कंपनीने अधिकृतरित्या असा कोणताही अलर्ट दिलेला नाही. तसेच जो अलर्ट काही विरोधी पक्षनेत्यांच्या मोबाईलवर आलेला आहे, तो कोणत्याही ‘विशिष्ट’ सरकारशी संबंधित नाही. आम्ही असे अलर्ट देत नाही. कारण खरोखरच आपल्या मोबाईलमध्ये हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर घुसविण्यात आले असेल तर अशा अलर्टमुळे ही कृती करणारी व्यक्ती अगर संस्था सावध होण्याची शक्यता असते. ती सावध झाल्यास पुढच्या वेळी कंपनीच्याही लक्षात येणार नाही, अशा प्रकारे हेरगिरी केली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे असे अलर्ट कधीही दिले जात नाहीत, असे स्पष्टीकरण अॅपल कंपनीकडून विरोधी पक्षांच्या आरोपांनंतर त्वरित देण्यात आले आहे.
150 देशात अलर्ट
भारतातील काही विरोधी पक्षनेत्यांना जो अलर्ट मोबाईलवर आलेला होता, तशाच प्रकारचा अलर्ट 150 देशांमधील राजकीय नेत्यांना आलेला आहे, हे देखील स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी येथील केंद्र सरकारवर केलेला आरोप बिनबुडाचा आणि हास्यास्पद ठरला आहे, अशी टीका अनेक तज्ञांनीही केली आहे. असा अलर्ट अॅपल कंपनीच्या नावे पाठविण्याचा खोडसाळपणा कोणीतरी केला असावा, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
भाजपने फेटाळले आरोप
विरोधी पक्षनेत्यांनी केलेले सर्व आरोप भारतीय जनता पक्षाने फेटाळले आहेत. केंद्र सरकारने कोणतीही हेरगिरी केलेली नाही. विरोधी पक्ष केवळ एका खोडसाळ अलर्टच्या नादाला लागून आरोप करीत आहेत. अॅपल कंपनीनेही असे अलर्ट पाठविल्याचा इन्कार केला आहे. तरीही विरोधकांना शंका वाटत असेल तर त्यांनी या प्रकरणात सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार सादर करावी, असे आव्हान माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षनेत्यांना दिले.
पेगॅसिसची आठवण ताजी
साधारण दीड वर्षांपूर्वी पेगॅसिस हेरगिरी प्रकरण असेच फुगविण्यात आले होते. केंद्र सरकार इस्रायलच्या कंपनीचे पेगॅसिस हे सॉफ्टवेअर उपयोगात आणून आपल्या विरोधकांवर हेरगिरी करत आहे, असा आरोप अनेक मान्यवरांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्वत:च्या देखरेखीखाली चौकशी समितीही स्थापन केली होती. समितीने जवळपास वर्षभर चौकशी करुन कोणताही निश्चित निष्कर्ष काढता येत नाही असे म्हणत केंद्र सरकारला क्लिन चिटच दिली होती. आता पुन्हा हेरगिरीचे कथित प्रकरण आल्याने ही आठवण ताजी झाली आहे.
पुन्हा राजकीय खळबळ
ड विरोधी पक्षांच्या हेरगिरीच्या आरोपांमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ
ड अॅपल कंपनीकडून त्वरित स्पष्टीकरण आल्याने आरोप ठरतात निरर्थक
ड केंद्र सरकारकडून कोणतीही हेरगिरी केल्याच्या आरोपाचा स्पष्ट इन्कार
ड भारताप्रमाणेच आयफोनवर अशा प्रकारचा अलर्ट किमान 150 देशांमध्ये









