ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या कोंढवा परिसरात अफीम विक्रीसाठी आलेल्या परराज्यातील तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 1 कोटी 16 लाख 74 हजार रुपये किंमतीचे 5 किलो 816 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आले आहे.
सुमेर जयरामजी बिष्णोई (वय 50, गोकुळनगर लेन, कात्रज-कोंढवा रस्ता. मूळ रा. जयराम आनंदनियोकी दानिया, हनुमान नगर तहसील बावडी, जोधपूर, राजस्थान), चावंडसिंग मानसिंग राजपूत आणि लोकेंद्रसिंह महेंद्रसिंह राजपूत असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शहरात अमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. पोलीस अंमलदार पांडुरंग पवार आणि सचिन मळावे यांना पेट्रोलिंग दरम्यान माहिती मिळाली की, गोकुळनगर येथील लेन नंबर 1 मधून कात्रज कोंढवा रोडकडे जाणाऱ्या स्नेहदत्त बिल्डिंगजवळ एकजण अफीम हा अमली पदार्थ विक्री करत आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून सुमेर बिष्णोईला ताब्यात घेतले. अधिक तपासाअंती त्याच्या ताब्यातून 64 लाख 28 हजार किमतीचा 3 किलो 214 ग्रॅम अफीम जप्त करण्यात जप्त आला आहे. याप्रकरणी बिष्णोईवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर पोलिसांना बिष्णोईच्या दोन साथीदारची माहिती मिळाली. बिष्णोईने हे अफीम चावंडसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून आणले होते. त्यांच्याकडे अफीमचा साठा असल्याचे समजले होते. चावंडसिंग आणि लोकेंद्रसिंह यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 52 लाख 4 हजार किमतीचा 2 किलो 602 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर करत आहेत.









