पुणे / वार्ताहर :
होळकरवाडी परिसरात बेकायदेशिररित्या केल्या जात असलेल्या अफूच्या शेतीवर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकत ती उध्वस्त केली. यावेळी 11 लाख 60 हजारांची तब्बल 1374 अफूची झाडे पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी दोन शेतकऱ्यांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.
राजाराम दामोदर होळकर (50, रा. होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) आणि बाळू किसन कटके (50, रा. पाटीनगर, होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोन शेतकऱ्यांची नावे आहेत.
होळकरवाडीत चिमणी तलावाच्या शेजारी गव्हाच्या शेतात अफूची शेती केली जात असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांचे पथक होळकवाडी येथे बुधवारी दुपारी दाखल झाले. राजाराम होळकर आणि बाळू कटके यांच्या सर्वेनंबर 180 आणि सर्वेनंबर 183 येथील शेतात अफूची झाडे आढळून आली. पोलिसांनी ही अफूची शेती उध्वस्त करत 11.60 लाख किंमतीची 1374 झाडे जप्त केली. यावेळी दोन्ही शेत मालकांना पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करत अटक केली आहे.
अधिक वाचा : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला; मॉर्निंग वॉकदरम्यान घडली घटना









