संघर्षविरामानंतरच्या शांततेत हवाई दलाचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यांनी केवळ शस्त्रसंधीचा भंग केला नाही तर भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा दुष्ट प्रयत्नही केला. भारताच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणेने प्रत्येक हल्ला हाणून पाडला. एवढेच नाही तर भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर अनेक क्षेपणास्त्रs डागली. हे काम भारतीय हवाई दलाने पूर्ण केले. अशा परिस्थितीत रविवारी भारतीय हवाई दलाने सोशल मीडिया ‘एक्स’वर “ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे” अशी पोस्ट करत भारतीय सुरक्षा यंत्रणा दक्ष असल्याचे सूचित केले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव आता संपुष्टात येत असल्याचे चित्र आहे. भारताच्या कठोर कारवाईनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव मांडला. भारताने स्वत:च्या अटींवर शस्त्रसंधी मान्य केली. पण, त्यानंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. तर, भारताने अद्याप सिंधू पाणी करारावर कोणताही निर्णय घेतलेला नाही, म्हणजेच हा करार सध्या तरी स्थगित राहील. याचदरम्यान आमचे सैन्य सज्ज असून पाकिस्तानने कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असे भारताच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
10 मे च्या रात्री देशाच्या पश्चिम सीमेवर युद्धबंदी उल्लंघनाच्या तुरळक घटना घडल्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेतली. शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानला जबाबदार धरले. तथापि, यानंतर सर्वत्र शांतता होती. दरम्यान, रविवारी आयएएफने आपल्या सोशल हँडलवर एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये ‘भारतीय हवाई दलाने (आयएएफ) ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नेमून दिलेली कामे अचूकतेने यशस्वीरित्या पार पाडली आहेत. राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार हे ऑपरेशन विचारपूर्वक आणि विवेकपूर्णपणे पूर्ण करण्यात आले, असे आयएएफने म्हटले आहे. तसेच ‘ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचे सांगत संपूर्ण तपशील वेळेत प्रदान केला जाईल’ असेही स्पष्ट केले आहे. याप्रसंगी आयएएफने सर्वांना अटकळ आणि बनावट बातम्या पसरवण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
पाकिस्तानची घाबरगुंडी
भारतीय हवाई दलाच्या स्पष्टीकरणानंतर पाकिस्तानमध्ये घबराट निर्माण होणे निश्चित आहे. भारतीय हवाई दल कधीही ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई सुरू करू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. देशात कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला हे युद्ध समजले जाईल, असे स्पष्टीकरणही सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडालेली दिसत आहे.
पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
पंतप्रधान मोदींकडून महत्त्वाची बैठक रविवारी घेण्यात आली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस अनिल चौहान यांच्यासह तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत गेल्या पाच दिवसातील घटनांचा आढावा घेऊन भविष्यातील रणनीतीवरही चर्चा करण्यात आल्याचे समजते.









