काश्मीर, गुजरातसह सहा राज्यांमध्ये ब्लॅकआउट, मॉक ड्रिल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑपरेशन शील्ड अंतर्गत शनिवारी पाकिस्तान सीमारेषेच्या जवळ असलेल्या जम्मू काश्मीर, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले. सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत एअर स्ट्राईक, हल्ला आणि ब्लॅकआउट ड्रिल पूर्ण करण्यात आले. सर्वप्रथम, सर्व 6 राज्यांमधील अनेक जिह्यांमध्ये एअर स्ट्राईक, बॉम्बस्फोट, गोळीबार, इमारतीत आग लागल्यास परिस्थिती कशी हाताळायची यावर सराव पूर्ण करण्यात आला. पोलीस, प्रशासन, एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्वयंसेवकांच्या पथकांनी त्यात भाग घेतला.
मॉक ड्रिल दरम्यान इमारतीत आग लागल्यास लोकांना बाहेर काढणे, जखमींना त्वरित वाचवणे आणि वैद्यकीय मदत देणे, रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठवणे, इमारतींमध्ये आग आटोक्यात आणणे यासाठी सराव घेण्यात आला. यादरम्यान, विलंब न करता जलद प्रतिसाद देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. रात्री 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत सदर राज्यांमध्ये ब्लॅकआउटही करण्यात आला. सायरन वाजल्याने अनेक जिह्यांमध्ये 15 मिनिटे, कुठे 20 ते 25 मिनिटे तर कुठे 30 मिनिटे ब्लॅकआउट झाले. या काळात पोलीस पथके गस्त घालत राहिली. या माध्यमातून लोकांना सतर्क करण्यात आले.
पूर्वनियोजनानुसार या राज्यांमध्ये 29 मे रोजी हा मॉक ड्रिल होणार होता, परंतु काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर शनिवार, 31 मे ही नवीन तारीख निश्चित करण्यात आली. 7 मे नंतर दुसऱ्यांदा पाकिस्तानशी सीमा असलेल्या या राज्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले आहे. 7 मे रोजी 244 शहरांमध्ये कवायती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये नागरिकांना हल्ल्यादरम्यान स्वत:चे संरक्षण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. युद्धाच्या बाबतीत लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करता यावी म्हणून हे करण्यात आले.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 7 मे रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याने 100 दहशतवाद्यांना ठार मारले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पाकिस्तानने सीमेला लागून असलेल्या भारतीय राज्यांवर ड्रोन हल्ले केले होते. सीमेवरही जोरदार गोळीबार झाला होता. ज्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले होते. तथापि, 10 मे रोजी दोन्ही देशांमधील शस्त्रसंधी करारानंतर सध्या परिस्थिती सामान्य आहे.









