बीएलएफचे 24 तासात 17 ठिकाणी बॉम्बस्फोट, लष्करी छावणीवरील हल्ल्यात18 सैनिकांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ क्वेट्टा
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील स्वातंत्र्याच्या लढाईला एक नवीन वळण मिळाले आहे. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने (बीएलएफ) गेल्या चोवीस तासात 17 हून अधिक ठिकाणी हल्ले करून पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. पंजगूर, सर्ब, केच आणि खारानसह अनेक जिह्यांमध्ये सुमारे 17 हल्ले ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा गोळीबार करत हल्ले चढवले. सर्बमध्ये लष्करी छावणीवर केलेल्या हल्ल्यात 18 सैनिकांना प्राण गमवावे लागल्याची माहिती देण्यात आली. ‘बीएलएफ’ने या संपूर्ण हल्ल्याला ‘ऑपरेशन बॉम्ब’ असे नाव दिले आहे. तसेच बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हल्ल्यांचे सत्र सुरूच राहील असे ‘बीएलएफ’ने जाहीर केले आहे.
बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या अशांतता आणि फुटिरतावादी तणावाकडे सध्या जगाचे लक्ष लागलेले आहे. सध्या सुरू असलेले बॉम्बस्फोट हे अलिकडच्या काळात ‘बीएलएफ’ने केलेले सर्वात मोठे हल्ले मानले जात आहेत. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी लक्ष्यित जिह्यांमध्ये शोधमोहीम सुरू केल्याचे वृत्त आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे केच आणि पंजगूरच्या काही भागात दळणवळण विस्कळीत झाले होते. तसेच यात मोठी जीवितहानी झाल्याचे बोलले जात असले तरी नेमकी आकडेवारी स्पष्ट झालेली नाही. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अद्याप स्फोटांमुळे झालेल्या नुकसानाची पूर्णपणे पुष्टी केलेली नाही. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीला अनुसरून प्रभावित भागात मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. स्फोटांदरम्यान लक्ष्य केलेल्या ठिकाणी लष्करी चौक्या, दळणवळण पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय सुविधांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. बलुच लिबरेशन आर्मीने लष्करी छावणीवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात फ्रंटियर कॉर्प्सचे 18 सैनिक मारले गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
‘ऑपरेशन बॉम्ब’ या प्रदेशातील वाढत्या बंडखोरांच्या क्षमतेचे प्रतिबिंबित करते. तसेच पाकिस्तानच्या नैर्त्रुत्य प्रांतातील अस्थिर सुरक्षा वातावरणाकडे निर्देश करते. येथे गेल्या दोन दशकांपासून सशस्त्र बंडखोरी आणि सरकारी दडपशाहीची सत्र सुरूच आहे. बीएलएफने पाकिस्तान सरकारवर बलुचिस्तानच्या संसाधनांचा गैरफायदा घेत असल्याचा आणि तेथील लोकांना मूलभूत अधिकार आणि स्वायत्ततेपासून वंचित ठेवल्याचा आरोप बराच काळ केला आहे.
पाकिस्तानला जेरीस आणण्याचा प्रयत्न
बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पूर्णपणे अराजकता निर्माण केली आहे. बलुचिस्तान प्रांतामध्ये एकूण 37 जिल्हे आहेत. प्रत्येक जिह्यात बलुचिस्तानचे बंड शिगेला पोहोचले आहे. पाकिस्तानी सैन्य आणि सरकारला रात्रं-दिवस आव्हान दिले जात आहे. सुरक्षा दलांवर हल्ले होत असून सीपीईसी प्रकल्पाचेही नुकसान करण्यात आले आहे. बलुच बंडखोरांनी आता ‘ऑपरेशन बॉम्ब’ नावाची एक नवीन मोहीम सुरू करताना समन्वयित हल्ले केले जात आहेत. तथापि, या वर्षाच्या सुरुवातीपासूनच अशा मोहीम राबवल्या जात आहेत. संपूर्ण बलुचिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी हल्ले केले जात आहेत.
प्राणघातक हल्ल्यांचे सत्र
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात लष्कराच्या ताफ्यावर किंवा चौकीवर हल्ला झालेला नाही असा एकही दिवस जात नाही. यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत ‘बीएलए’ने 284 हल्ले केले. या हल्ल्यांपैकी 9 विशेष मोहीमा, 3 फिदाईन हल्ले, 121 बॉम्ब किंवा आयईडी स्फोटांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये 668 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय, बीएलएने बलुचिस्तानमधील 45 महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेतली असून त्यात कलाट जिह्यातील मंगोचर शहराचाही समावेश आहे.









