खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा : आधुनिक शस्त्रांच्या प्रशिक्षणाचा जत्थेदाराकडून संदेश
वृत्तसंस्था/ अमृतसर
ऑपरेशन ब्ल्यू स्टारला 38 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त श्री अकाल तख्त साहिबच्या जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी शिखांना आधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण देण्याचा संदेश दिला आहे. यादमयान श्री अकाल तख्त साहिबच्या परिसराबाहेर खलिस्तान जिंदाबाद अशा देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. श्री अकाल तख्त साहिबचे जत्थेदार संदेश देत असताना दुसरीकडे खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या.
ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी स्वतःच्या देशात ख्रिश्चन धर्माच्या प्रचारावर चिंता व्यक्त केली. गावांमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला जात असून हा चिंतेचा विषय आहे. शीख प्रचार समिती आणि संस्थांनी गावांमध्ये आणि विशेषकरून सीमावर्ती भागात जात शिख धर्माचा प्रचार करावा असे त्यांनी म्हटले आहे. शीख धर्म बळकट झाल्यास शीखधर्मीय आर्थिक आणि सामाजिक दृष्टय़ा मजबूत होतील. या तिन्ही गोष्टींमध्ये मजबूत झालो तर राजकीयदृष्टय़ा मजबूत होण्यास कुणीच रोखू शकत नसल्याचे विधान त्यांनी केले आहे.
जत्थेदार बदलण्याची मागणी
माजी खासदार आणि अकाली दलाचे नेते सिमरनजीक सिंह मान यांनी यादरम्यान श्री अकाल तख्त साहिबच्या जत्थेदाराच्या जागी तुरुंगात कैद जगतार सिंह हवारा यांना जत्थेदार करण्याची मागणी केली. सरबत खालसाकडून निवडण्यात आलेले जत्थेदार ज्ञानी धान सिंह मंड यांनी शिखांच्या पलायनावर चिंता व्यक्त केली आहे. शीखधर्मीय विदेशात जात आहेत, तर येथे असलेले लोक अमली पदार्थांना बळी पडत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
मोठा बंदोबस्त
सुवर्णमंदिरापर्यंत जाणाऱया सर्व मार्गांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला हाहेता. परिसरात एसजीपीसीकडून स्वतःचे टास्क फोर्स तैनात करण्यात आले आहे.









