वृत्तसंस्था/ मस्कत (ओमान)
येथे मंगळवारपासून पुरूषांच्या आशियाई हॉकी फाईव्ह विश्व चषक पात्र फेरीच्या हॉकी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत मंगळवारी भारतीय हॉकी संघाची सलामीची लढत बांगलादेशबरोबर होणार आहे. सदर ही स्पर्धा 2 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा इलाईट गटात समावेश करण्यात आला असून मलेशिया, पाकिस्तान, जपान, यजमान ओमान व बांगलादेश यांचा या गटात सहभाग आहे. तर चॅलेंजर्स गटात हाँगकाँग, चीन, इंडोनेशिया, अफगाण, कझाकस्तान आणि इराण यांचा समावेश आहे. सदर स्पर्धेमध्ये भारताचा मंगळवारी बांगलादेशबरोबर सलामीचा सामना झाल्यानंतर भारताचे या स्पर्धेतील पुढील सामने ओमान आणि पाकिस्तानबरोबर बुधवार 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी भारताचे उर्वरीत सामने मलेशिया आणि जपानबरोबर होतील. मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या आशियाई हॉकी फाईव्ह एस विश्व चषक पात्र फेरीच्या स्पर्धेतील पहिले तीन संघ 2024 साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी फाईव्ह एस विश्व चषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या आगामी स्पर्धेत एकूण 16 संघांचा सहभाग राहील.
2024 साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी फाईव्ह एस विश्व चषक स्पर्धेसाठी ओमानचा संघ यजमानपद भूषवत असल्याने यापूर्वीच पात्र ठरला आहे. त्याचप्रमाणे पात्र फेरीच्या आफ्रिका, अमेरिका, युरोप आणि ओसेनिया या खंडातून होणाऱ्या पात्र फेरी स्पर्धेतील आघाडीचे तीन संघांचा समावेश राहील. भारतीय हॉकी संघाचा बांगलादेशबरोबरचा यापूर्वीचा सामना 2021 साली हिरो पुरस्कृत आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत झाला होता आणि भारताने त्यात सामन्यात बांगलादेशचा 11-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला होता. त्याचप्रमाणे भारताचा ओमानबरोबरचा शेवटचा सामना चेन्नईत अलिकडेच झालेल्या हिरो पुरस्कृत आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत झाला होता आणि भारताने ओमानचा 4-0 असा फडशा पडला होता. भारत आणि मलेशिया यांच्यातील यापूर्वीची लढत 2023 च्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत झाली होती आणि भारताने मलेशियाचा 4-3 असा पराभव केला होता. हरमनप्रित सिंगच्या नेतृत्त्वाखालील भारतीय हॉकी संघाने चेन्नईतील स्पर्धेत जपानचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला होता. या स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाचे उपकर्णधारपद मोहम्मद मुसेनकडे सोपविण्यात आले आहे.









