भीमसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कुकडोळी (ता. बेळगाव) येथील शेतवडीतून ये-जा करण्यासाठी असणारा मार्ग बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे असलेला मार्ग निर्माण करून देण्यात यावा, अशी मागणी करत भीमसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. कुकडोळी येथील सर्व्हे क्रमांक 16, 17, 18, 19 मध्ये दलित शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. या शेत जमिनीसाठी ये-जा करण्यासाठी असणारी पायवाट बंद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दोन ते तीन कि. मी. फेरा मारून शेतीला जावे लागत आहे. यामुळे सदर शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असून उद्देशपूर्वक वाट अडविण्यात आली आहे. यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मागासवर्गीय समाजातील शेतकरी असल्याने हा अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
कायद्याची अंमलबजावणी करा
सदर शेतकऱ्यांना शेतीकडे ये-जा करण्याकरिता पूर्वीप्रमाणे असलेली वाट उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच सरकारकडूनही शेतीसाठी वाट उपलब्ध करून देण्याकरिता कायदा जारी करण्यात आला आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना देण्यात आले. यावेळी अक्षय के. आर., मल्लाप्पा अक्कम•ाr, अजय शिंगे, निखिल कोलकार, सचिन कोलकार आदी उपस्थित होते.









