आमदार सेठ यांची सूचना : तहसीलदार-मनपा अधिकाऱ्यांसह पाहणी
बेळगाव : शहरातून वाहणाऱ्या लेंडी नाल्याचे पाणी शिवारामध्ये शिरत आहे. त्यामुळे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गानजीक पाईप खुले केल्यास सांडपाणी महामार्गाच्या दुसऱ्या बाजुला जाण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे पाईप खुले करावे, अशी सूचना आमदार असिफ सेठ यांनी सोमवारी तहसीलदार तसेच महापालिका अधिकाऱ्यांना केली. बेळगाव शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार सोमवारी आमदारांनी लेंडी नाला तसेच आसपासच्या परिसराची पाहणी केली. नाल्याच्या पाण्याचा निचरा न झाल्यास याचा फटका शहर तसेच उपनगरांना बसणार आहे. हायवेनजीकचे पाईप बंद असल्यामुळे पाणी हायवेच्या दुसऱ्या बाजूला जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हे सर्व पाईप खुले करा, तसेच कालवेही खुले करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नाल्याच्या एका बाजूने बफरझोन करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी संपर्क साधू, असे ते म्हणाले. तहसीलदार बसवराज नागराळ यांनीही आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महापालिकेच्या अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी लेंडी नाल्याविषयी माहिती दिली.









